#श्रावण विशेष: श्रावणमासी हर्ष मानसी… (भाग १)

डॉ. यशवंत पाठक 
श्रावण महिना हा चातुर्मासातील महत्त्वाचा महिना मानला जातो. चातुर्मास आषाढी एकादशीपासून सुरू होतो आणि त्याची समाप्ती कार्तिकी एकादशीला होते. या चार महिन्यांच्या काळात या ना त्याप्रकारची व्रतवैकल्ये केली जातात. दुसरीकडे या काळात निसर्गबहराला उधाण आलेले असते. श्रावणाची शोभा, श्रावणातले आकाश आणि श्रावणातले हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन हा एक विलक्षण अनुभव असतो. कोवळ्या तृणांकुराने पृथ्वी झाकून टाकली जातेच, पण त्याहीपेक्षा डोंगरांचे सौदर्य मात्र शब्दांत पकडता येत नाही. 
श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. महाराष्ट्रापुरते सांगायचे तर श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवशी एखादे तरी धर्मकृत्य करण्यास सांगितले आहे. यामध्ये श्रावणी सोमवार, मंगळवारपासून शनिवारपर्यंत सर्व प्रकारच्या देवतांची पूजा करण्याची पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे. श्रावणात झुलन यात्रा, रक्षाबंधन, जन्माष्टमी आणि दहीहंडी हे विशेष उत्सवही मोठ्या आनंदोत्साहाने साजरे केले जातात. यामध्ये प्रथम येतो तो नागपंचमी हा सण. श्रीकृष्णाने कालियाचा पराभव याच दिवशी केला होता असे मानले जाते. पृथ्वीचा रक्षक नाग आहे अशी कल्पना करून नागपंचमीची पूजा केली जाते. विष्णुपुराणात याचे उल्लेख मिळतात. महासागरामध्ये शेषासनावर विष्णू जेव्हा शयन करतो तेव्हा नाग त्याच्यावर छत्र धरतो अशी कल्पना आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षक आहेत अशी भावना ठेवून ही पूजा करण्याची प्रथा आहे.
श्रावणात “श्रावणी’ हा विशिष्ट प्रकारचा विधी केला जातो. या निमित्ताने मनाचे शुद्धीकरण केले जाते. अभ्यासाला सातत्याने तत्पर राहाण्याच्या वृत्तीचा बोध केला जातो. श्रावणात महत्त्वाचा सण येतो तो नारळीपौर्णिमा. या दिवशी वरुण देवतेची उपासना करत समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. समुद्र शांत व्हावा, त्याने आम्हाला त्याची संपत्ती आनंदाने द्यावी, समुद्रकाठच्या निवासी लोकांना कसलाही त्रास होऊ नये, या माणसांनी आनंदाने राहावे अशी भावना त्यात आहे.
भगवान गोपालकृष्णांची जन्माष्टमी संपूर्ण भारतात साजरी होते. गोपालकृष्णांनी निष्काम कर्मयोगाचा संदेश संपूर्ण विश्‍वाला दिला. त्यातून त्यांनी समाजाला सतत कर्तव्याचे भान दिले. समाजाला विशिष्ट प्रकारची दृष्टी दिली. म्हणूनच श्रीकृष्णाची पूजा महत्त्वाची मानली जाते. श्रीकृष्णांनी उपदेश केलेली भगवद्‌गीता विश्‍वात श्रेष्ठ मानली जाते. त्यात ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोगही आहे. अनेक अभ्यासकांनी यातून ग्रंथनिर्मिती केली आहे. लोकमान्य टिळकांना यातून गीतारहस्य सुचले. योगी अरविंदांना पूर्णयोग यातूनच मिळाला. ज्ञानदेवांची ज्ञानेश्‍वरी ही गीतेचे निमित्त आहे. मराठी माणसाला सुबोध आत्मज्ञान कसे होईल यातून ज्ञानेश्‍वरीची निर्मिती झाली.
माणसाने स्वच्छपणाने आपली कर्तव्य कर्मे केली पाहिजेत हा गीतेतील सारसंदेश आहे. शुद्ध अंतकरणाने अनन्यभावाने परमेश्‍वराला शरण जाणे आणि निष्काम कर्म करणे हे आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय असले पाहिजे, ही जाणीव गोपालकृष्णांनी प्राधान्याने दिली. महाभारताच्या युद्धाचा साक्षीदार कृष्ण आहे. पांडवांच्या सद्‌गुणांना जपून श्रीकृष्णांनी कौरवांना शिक्षा केली. आजही महाभारत लोकांना आवडते. कारण घराघरात महाभारत आहे. सर्व प्रकारच्या वृत्ती आणि कृती मानवी जीवनात पाहायला मिळतात. मात्र, माणसाने त्या पलीकडे जाणे हे सर्वात महत्त्वाचे असते.
श्रावणामध्ये पिठोरी अमावस्येला “पोळा’ हा सण साजरा करतात. भारतीय संस्कृतीत गोधनाचे जसे महत्त्व आहे तसेच बैलाचेही वेगळे स्थान आहे. शिवाचे वाहन नंदी आहे. शेतीच्या एकूण कृत्यात बैलांच्या श्रमाचा वाटा मोठा आहे. नांगर अवतरण्यापूर्वी संपूर्ण शेती बैलांवरच अवलंबून होती. म्हणूनच पोळ्याच्या दिवशी त्यांच्याविषयीची कृतज्ञता पाळायची असते.
श्रावणामध्ये अनेक कहाण्यांना बहर आलेला दिसतो. कहाणी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. समाज ज्या वेळेला मौखिक परंपरेवर पूर्णपणे अवलंबून होता त्यावेळेला या कहाण्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेल्या. श्रावणातील कहाण्यांमध्ये त्या त्या दिवसाची महती वर्णिली आहे.
त्या व्रताचे मोठेपण सांगितलेले आहे. या प्रत्येक कहाणीत सर्वात शेवटची ओळ येते “साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.’ सात उत्तरे म्हणजे जीवनाची सप्तपदी आहे. त्यात कर्तव्य, सेवा, ज्ञान, कर्म, सत्संग, उपासना अभ्यास ही सात श्रेष्ठ कर्तव्ये सांगितलेली आहेत. या कर्तव्यातून धर्म, अर्थ, काम, मोक्ष आणि आनंद ही फळे मिळतात. आनंद कधीही उचलून मिळत नाही. त्याला कष्ट करावे लागतात. कहाण्यांमध्ये असणारी ही जाणीव अत्यंत महत्त्वाची आहे. मग ती कहाणी “आदित्यराणूबाई’ची असो, “शिवामुठीची’, “खुलभर दुधाची’ किंवा “शिळासप्तमीची’ असो ! श्रावणात शंकराचे व्रत अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. 12 ज्योतिर्लिंगापैकी 8 ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. यामध्ये शिवोपासनेचा भाव फार महत्त्वाचा आहे. ती स्वयंभू आहे. शिव म्हणजे कल्याण करणारा. कल्याणाला दोन महत्त्वाची अधिष्ठाने लागतात. वैराग्य आणि अभ्यास. सर्व प्रकारचा अहंकार टाकून विनम्रतेने ज्ञानाला सामोरे गेल्यास ते ज्ञानआत्मज्ञानाची जाणीव करून देते. म्हणून 16 सोमवाराचे व्रत श्रावणी सोमवारापासून सुरू करण्याची प्रथा आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)