परिंचे- श्री क्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे श्रावण वद्य अमावासानिमित्त श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे चार वाजता पूजा करून मुख्य गाभारा बंद करण्यात आला. त्यानंतर सकाळी सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने देवाला अभिषेक करण्यात आले. सकाळी दहा वाजता भाविकांच्या दहीभात पूजा बांधण्यात आल्या. दगडी कासवावर सालकरी गोसावी मंडळींचा पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. दुपारी 12 वाजता देवाची धुपारती होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी 1.15 वाजता मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना नेताजी बाबुराव धुमाळ यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, दर्शनबारी, मंदिर परिसर स्वच्छता, स्वयंसेवक, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तीन ठिकाणी वाहनतळ, रुग्णवाहिका आदी व्यवस्था पुरवण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, विश्वस्त दत्तात्रय धुमाळ, दिलीप धुमाळ, ज्ञांनेश्वर धुमाळ, बबन धसाडे आदी उपस्थित होते. श्रावण अमावास्या उत्सवाच्यानिमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पोलीस मित्र संघटनेच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे देवस्थान ट्रस्टचे सचिव तय्यद मुलाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)