श्रावणी सोमवारामुळे गणपती घाटाला यात्रेचे स्वरूप

ग्रामदेवतेसह हजारो भक्तांनी घेतला दक्षिणकाशी गंगेच्या स्नानाचा आनंद
वाई, दि. 3 (प्रतिनिधी)- श्रावण महिन्यात कृष्णा नदीच्या स्नानाची पर्वणी काही वेगळीच असते. शेवटच्या श्रावणी सोमवारी वाई तालुक्‍यातील प्रत्येक गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या स्नानासाठी कृष्णा नदीवर येतात. त्यामुळे गणपती घाटावर प्रचंड भक्तांची गर्दी होते. त्यामुळे आज गणपती घाटाला यात्रेचे स्वरूप आलेले असते.
वर्षानुवर्षे ही परंपरा चालू असून शेवटच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने वाई तालुक्‍यातील ग्रामस्थ आपल्या कुलदैवतांचे पालखीत बसवून वाजत-गाजत कृष्णातीरी आणून विधिवत पूजा करून स्नान घालून पुन्हा गुलालाची उधळण करीत आपल्या गावी मार्गस्त होतात. श्रावण महिन्याचे औचित्य साधून या देवतांच्या पालख्या दरवर्षी दक्षिणकाशीची गंगा म्हणून प्रसिध्द असणाऱ्या कृष्णामाईच्या स्नानाला येण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे. पूर्वी वाजत-गाजत बैल गाडीतून वाईच्या गणपती घाटावर कृष्णा नदीच्या स्नानाला आणले जात असे. हा सोहळा पाहण्यासाठी गणपती घाटावर वाईकरांची मोठी गर्दी झालेली होती. गणपती घाटावर तालुक्‍यातील मानाच्या पालख्यांचा रुबाब वेगळाच असतो. आपल्या ग्रामदेवते बरोबर घरातील देवसुध्दा यावेळी कृष्णा स्नानाला आणले जातात. विधिवत स्नान घालून जल अभिषेक केला जातो. यावेळी गणपती घाटावर सोनजाई मठातील पथकाने ढोल-लेझीमचे ताल धरल्यामुळे घाटावरील वातावरण भक्तिमय झाले होते.
महागणपती घाट व काशिविश्वेश्‍वराचे दर्शन घेवून भाविक आपल्या ग्रामदेवतेला पालखीत ठेवून मिरवणुकीने आपल्या गावी निघून गेल्या. कृष्णेच्या आरतीच्या वेळेस चक्क अनेक भक्तांच्या अंगात देवी आल्याचे प्रखरतेने दिसत होते. गणपती घाटाशेजारी असणाऱ्या काशीविश्वेश्वर व फुलेनगर येथील भद्रेश्वर मंदिरात सुध्दा भक्तांची प्रचंड गर्दी होती. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)