
मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या
सातारा,दि.12 प्रतिनिधी: जिल्ह्यातील धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बॉम्बे रेस्टॉंरटपासून काढण्यात आलेल्या मोर्चानंतर धरणग्रस्त व दुष्काळग्रस्तांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तो पर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याचे डॉ.प्रशांत पन्हाळकर यांनी सांगितले.
सातारा व पाटण तालुक्यातील बुडीत गावांचे कॅम्पमध्ये सर्वासमक्ष अंतिम केलेले संकलन रजिस्टर त्वरित मंजूर झाले पाहिजे. कराड, पाटण, खटाव, कोरगाव व सातारा तालुक्यात प्रकल्पग्रस्तांना कमी पडत असलेली जमीन मागणी केल्याप्रमाणे गायरान, मुलकीपड सरकारी जमीन देण्यात यावी. करंजोशी ता.सातारा येथील शेतकऱ्यांनी त्यांची जमीन खासगी वाटाघाटीने देण्याची सहमती दर्शविली आहे. मात्र, तो प्रस्ताव अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला आहे. सावरघर ता.पाटण येथील वाटाघाटीने देण्यात येणारी तसेच सक्तीने घ्यावी लागणारी जमीन संपादित करण्यात यावी. देवाचा माळ येथील प्रकल्पग्रस्तांसाठी गावठाण विकसित करण्यात यावे. पुर्नवसनाची जमीन वगळण्यासाठी कोर्टात गेलेल्यांनी पुर्नवसनग्रस्तांना प्रतिवादी केले आहे. त्यामुळे प्रतिवादीच्यावतीने कृष्णा खोरे विकास महामंडळाने वकील नियुक्त करण्यात यावा. करंजोशी ता.सातारा, सावरघर ता.पाटण, बापोशी ता.खटाव यासह इतर ग्रामपंचायती स्थापन करण्यातमधील अडचणी दूर कराव्यात. मायणी गावठाणाचे बोपोशी तसेच क्रांतीवीरनगर भानसेवाडी ही महसूली गावे तयार करण्यात यावीत. तारळी धरणाच्या दोन्ही बाजूचे रस्ते रिंग पध्दतीने जोडण्यासाठी उर्वरित रिंगरोडचे सर्वेक्षण त्वरित पुर्ण करण्यात यावे तसेच उर्वरित रिंगरोड डांबरीकरणाचे पुर्ण करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा