श्रमिक महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गिरणी कामगारांच्या घरांसह पेन्शनचा प्रश्‍न सोडवण्याची मागणी

सातारा – गिरणी कामगारांना घरे द्या तसेच ईपीएस पेन्शन लागू करा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमिक महासंघाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारने निवडणूकीपुर्वी मागण्या मान्य न केल्यास भाजपला मत न देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

-Ads-

हुतात्मा स्मारक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कॉ. नाना जगताप, कॉ.श.ह.पाटील, कॉ. विजय निकम, कॉ. वंसत नलवडे यांच्यासह गिरणी कामगार उपस्थित होते.

सरकारने गिरणी कामगारांच्या घरांचा आराखडा तयार करावा तसेच कोशियारी कमिटी शिफारशीप्रमाणे पेन्शन 3 हजार रूपये व महागाई भत्ता लागू करा, अन्यथा येत्या निवडणूकीत भाजपला मत देणार नाही, असा नोटीसवजा इशारा देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. भांडवलदारधार्जिणे धोरण यापुर्वी कॉंग्रेस आणि आता भाजप सरकार रेटत असून त्यामुळे श्रमिकांचे प्रश्‍न अद्याप सुटू शकले नाहीत. मुंबई येथील गिरण्यातील कामगार हा महाराष्ट्र सरकारच्या धोरणामुळे विस्थापित झाला आहे.

मुंबई शहराच्या विकास नियमावलीत दुरूस्ती करून औद्योगिक भुखंडावर वाणिज्य किंवा रहिवासी वापरास परवानगी देणारा बदल सरकारने केला. त्याचा वापर मुंबई महापालिकेने करण्याऐवजी कारखाने, गिरण्या बंद करण्याचा जमिनी विकासकांना विकण्याचा विचार व व्यवहार प्रबळ झाला व त्यामुळे मुंबई येथील गिरण्या कारखाने बंद झाले. सरकारने केलेल्या नियमावलीत गिरणी कामगारांना घर देण्याचा विचार आहे. त्याप्रमाणे निवासी गाळ्यांचे बांधकाम झाले व ती घरे लॉटरी पध्दतीने कामगारांना देण्यात आली. आजपर्यंत 1 लाख 80 हजार कामगारांनी पुनर्वसनासाठी नोंदणी केलेली आहे. परंतु त्यापैकी केवळ 7 हजारांपेक्षा कमी व्यक्तींना लाभ झालेला आहे. तसेच काही व्यक्तींनी दुबार नोंदणी करून लाभ घेतला. त्याची चौकशी होणे आवश्‍यक आहे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)