श्रमांची जादू

डॉ. न. म. जोशी

एका गावात श्रमिक नावाचा एक शेतकरी होता. त्याच्या वडिलांनी त्याचं नाव श्रमिक ठेवलं. कारण त्यानं भरपूर श्रम करावेत आणि मेहनत करून आपल्या आयुष्याची उभारणी करावी असं त्यांना वाटत होतं. श्रमिक मोठा झाला. लग्न झालं. संसार वाढला. शेतीही वाढली. त्याची शेती फळाफुलांनी पिकांनी बहरली. श्रमिकाची शेती इतरांचा शेतीपेक्षा उजवी होती. त्याच्या शेतात जास्त पीक येई. गावातील इतर शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल मत्सर वाटू लागला. ते म्हणत… ‘आम्हीही शेती करतो. श्रमिकही शेतीच करतो. आमची शेती एवढा उतारा देत नाही. श्रमिकाचा शेतीचा उतारा खूप असतो.

श्रमिकाजवळ काही जादू असली पाहिजे किंवा एखादी गुप्तविद्या असली पाहिजे, असं तेथील इतर शेतकऱ्यांना वाटलं. त्यासाठी त्यांनी राजाकडं गाऱ्हाणं मांडायचं ठरवलं सर्व शेतकरी मिळून राजाकडं गेले. ते म्हणाले, “महाराज, या श्रमिकाकडं अशी काहीतरी जादू आहे किंवा गुप्त विद्या आहे. ती त्यानं आम्हाला सांगितली तर आमचीही शेती फुलेल. ती गुप्तविद्या आम्हालाही देण्यास तुम्ही श्रमिकाला सांगावे.’ राजानं श्रमिकाला दरबारात येण्यासाठी सांगावा धाडला. श्रमिक आला. “श्रमिका, गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तुझ्याजवळ शेतीची काहीतरी गुप्तविद्या आहे. जादू आहे. ती तू इतरांना सांगावीस म्हणजे त्यांचीही शेती सुधारेल.’ राजानं आज्ञा फर्मावली.

“महाराज, माझ्याजवळची विद्या मी इतरांना देण्यास तयार आहे. सर्वांनी माझ्या शेताकडं यावे,’ या श्रमिकाच्या निमंत्रणानुसार राजासह सर्व शेतकरी श्रमिकाच्या शेतावर गेले. तिथे त्यांनी काय पाहिलं… एक देखणी बैलजोडी होती. श्रमिकाची मुलगी त्या बैलांना चारा घालत होती. श्रमिकाची दोन मुलं दुसरी धष्टपुष्ट बैलजोडी घेऊन शेतात नांगर धरीत होते. श्रमिकाची पत्नीही मुलांसाठी आणि नवऱ्यासाठी जेवण घेऊन शेतावर आली होती. श्रमिक म्हणाला, “पाहिलंत महाराज. माझं सर्व कुटुंब या शेतात मेहनत करते. माझी मुलगीसुद्धा बैलजोड्यांची दखल घेते. मुलं घाम गाळतात. पत्नी आम्हाला चांगलं खाऊ घालते. आम्ही सारेच दिवस-रात्र या काळ्याआईची सेवा करतो. मग ही काळी आई आम्हाला प्रसन्न होते. भरभरून देते.’ श्रमिकाचं हे बोलणं ऐकून राजा भारावला. राजा इतर शेतकऱ्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याकडं तक्रार घेऊन येण्याऐवजी श्रमिकाचंच मार्गदर्शन घ्यायला हवं होतं.’ सर्व शेतकरी खजिल झाले. त्यांना आता उपरती झाली होती.

कथाबोध
बऱ्याच लोकांना श्रमाविना पैसा मिळावा, कष्टाविना फळ मिळावं आणि काहीतरी जादू होऊन आपली बरकत व्हावी असं वाटत असतं. अखेर जादू ही नजरबंदीचा खेळ असते. वास्तव काही वेगळंच असतं. जीवनाची उभारणी करायची असेच तर अथक परिश्रमांची जादूच कामी येते. परिश्रम करणाराच जादूगार असतो. श्रम करण्यासाठी साधनसामग्री ही जादूची साधनं असतात. ती वापरली की जादू होते आणि मग चमत्कार घडावा त्याप्रमाणं आपल्या लाभ दिसू लागतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)