श्रद्धेच्या नावाने होणारा हिंसाचार सहन केला जाणार नाही

पंतप्रधान मोदी यांचे “मन की बात’मध्ये प्रतिपादन

नवी दिल्ली – श्रद्धेच्या नावाखाली होणारा हिंसाचार सहन केला जाणार नाही. श्रद्धेच्या नावांखाली कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. प्रत्येक व्यक्तिने कायद्याचे पालन केलेच पाहिजे, कायदा जबाबदारी निश्‍चित करेल आणि दोषींना निर्विवादपणे शिक्षा केली जाईल, असे पंतप्रधानांनी आकाशवाणीवरील “मन की बात’ कार्यक्रमात स्पष्ट केले.
भारत ही बुद्ध आणि गांधींची भूमी असल्याचे सांगून देशाच्या ऐक्‍यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सरदार पटेलांचीही ही भूमी आहे असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या पूर्वजांनी अनेक शतकं सामजिक मूल्ये, अहिंसा, परस्परांविषयी आदर रुजवले आणि लोकांसाठी हा वारसाच आहे.

गांधी जयंतीच्या आधी किमान 15 दिवस आधी स्वच्छता ही सेवा ही मोहीम करावी असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले. तीन वर्षापूर्वी सुरु करण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेला 2 ऑक्‍टोबर रोजी तीन वर्ष पूर्ण होत आहेत असे ते म्हणाले. या मोहिमेचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, लोकसंख्येच्या टक्केवारीत स्वच्छतागृहांच्या संख्येत 39 टक्‍क्‍यांवरुन 67 टक्क्‌यांपर्यंत वाढ झाली आहे आणि 2 लाख 30 हजार गाव उघड्यावरील शौचापासून मुक्त जाहीर झाली आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.

यंदाची गांधी जयंती स्वच्छ 2 ऑक्‍टोबर म्हणून साजरी केली जाईल, याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. गुजरातमधल्या पूराच्या वेळी मंदीरं आणि मशिदींची साफ-सफाई करण्यासाठी जमात-उलेमा-ए-हिंदच्या कार्यकर्त्यांच्या कामाचा पंतप्रधानांनी गौरव केला.

उत्सव हे श्रद्धेचे चिन्ह असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, घरे, सणं आणि स्वच्छता हे एकमेकांशी गुंफलेले आहेत. सणांसाठीची तयारी ही नेहमीच स्वच्छतेपासूनच सुरु होते असेही त्यांनी सांगितले. सण आणि उत्सवांमुळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्याची संधी उपलब्ध होते आणि या दिशेने आणखी काय करता येईल याबद्दल सर्वांनी विचार करायला हवा, असे ते म्हणाले. छोटे दुकानदार, भाजी विक्रेते आणि ऑटो-रिक्‍शा चालक कष्टातून पैसा मिळवत असल्याने लोकांनी त्यांच्याबरोबर सौदेबाजी करु नये, असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतींना उजाळा देत, देशातल्या तरुण पिढीने क्रीडा विश्वात पुढे यावे असे पंतप्रधानांनी सांगितले. क्रीडा कौशल्याचा शोध घेऊन हे कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा मंत्रालय स्पोर्टस्‌ टॅलंट सर्च पोर्टल सुरु करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. आयएनएस तारिणी या छोट्या नौकेतून सागरी परिक्रमेला निघालेल्या नौदलातल्या तरुणींची प्रशंसा करत अशा प्रकारची जगातली ही पहिलीच घटना असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीयांना आपल्या या लेकींचा अभिमान वाटला पाहिजे असे ते म्हणाले.

देशाच्या परिवर्तनासाठी परिवर्तनाकरता शिकवणूक या मंत्रासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशाच्या परिवर्तनात शिक्षक मोलाची भूमिका बजावतात, असे पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांचे स्मरण करुन स्पष्ट केले . प्रधानमंत्री जन धन योजनेला उद्या तीन वर्ष पूर्ण होत असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की, या योजनेशी नवीन 30 कोटी कुटुंब जोडली गेली असून, दुर्बल घटकांकडून जवळपास 65 हजार कोटी रुपये बॅंकेत जमा झाले आहेत. आधुनिकतेची व्याख्या सदैव बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. लोक पर्यावरण विषयक जागरुक होत असून ते पर्यावरणस्नेही गणेश मूर्तींबाबत प्रयोग करत आहेत असेही पंतप्रधान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)