शोपियनमधील चकमकीत 5 दहशतवादी ठार

श्रीनगर – जम्मू काश्‍मीरमधील शोपियन जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या चकमकीदरम्यान एक सामान्य नागरिकही मरण पावला, तर सुरक्षा दलांबरोबर झालेल्या संघर्षादरम्यान अन्य 10 जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री शोपियनमधील किलूरा भागामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला होता. याच भागात सकाळीही पुन्हा नव्याने चकमकीला सुरुवात झाली. त्यावेळी झालेल्या कारवाईदरम्यान अन्य चार दहशतवादीही मारले गेले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

चकमकीमध्ये मरण पावलेले सर्व पाचही दहशतवादी स्थानिक आहेत. चकमक संपल्यावर ठिकठिकाणी निदर्शकांनी सुरक्षा दलांवर हल्लेही केले. गनोवपूरा भागातील गोळीबारात एक नागरिक मरण पावला. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले.

शोपियन जिल्ह्यातील शेख मलिकगुंड येथे एका दहशतवाद्याच्या दफनविधीच्या प्रार्थनेला लष्कर ए तोयबाचा दहशतवादी नवीद जट्ट नाट्यमयरितीने उपस्थित झाला होता. 14 जून रोजी हत्या करण्यात आलेले पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्येप्रकरणी जट्ट याला अटक केली गेली होती. पण त्याला रुग्णालयात नेले जात असताना त्याने पलायन केले होते.

दफनविधीच्या वेळी शेकडो समर्थकही उपस्थित राहिले होते. त्यांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. जमावाला विखुरण्यासाठी सुरक्षा दलांनी पॅलेट गन आणि हवेत गोळीबार केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)