शॉर्टसर्किटने 70 एकरातील ऊस जळाला

मुंढे येथील घटना, कोट्यावधीचे नुकसान
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) -शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत सुमारे 70 एकर क्षेत्रातील ऊस जळाल्याची घटना मुंढे (ता. कराड) येथे शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेत शंभरहून अधिक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले असून सलग याच ठिकाणी घडलेली ही सलग पाचवी घटना आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळेच या घटना घडल्या असून पाच वर्षात रूपयाचीही भरपाई मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मुंढे येथील माऊटी आणि माऊल्या नावाच्या शिवारातून गेलेल्या 11 के. व्ही. विद्युत वाहिनीचे स्पार्किंग होऊन त्याच्या ठिणग्या उसाच्या क्षेत्रात पडल्या. त्यामुळे उसाने पेट घेतला. आग पसरत जाऊन धुराचे लोट उसळले. दरम्यान, रानातील बांधावर बसलेल्या दोघांना आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलांना आग लागल्याचे दिसले. त्यांनी गावातील लोकांना घटनेची माहिती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, आगीने उसाचे बरेच क्षेत्र व्यापले होते. त्यामुळे आग विझविण्याचे प्रयत्न फोल ठरले. या आगीत एका शेतकऱ्याच्या साडे तीन एकरातील ठिबकची यंत्रणाही जळून पावणे दोन लाखाचे नुकसान झाले.
संगम पाणी पुरवठा योजनेसाठी टाकण्यात आलेल्या वीजेच्या लाईनचे खांब शेताकडेला आणि शेताकडेला उभारण्यात आले आहेत. वास्तविक शेताच्या मध्यभागी विद्युत खांब उभारता येत नाहीत. तसेच वीजेच्या तारांचे ताण काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे तारा लोंबकळताना दिसत आहेत. शॉर्टसर्किट होऊन ऊस जळण्याची आजही ही पाचवी घटना आहे. यापूर्वी सलग चार वर्षे अशाच प्रकारे याच शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यामुळे चार वर्षे शेतकऱ्यांचा या शिवारातील ऊस कारखान्याकडे गळीतास गेलेला नाही. गत वर्षी आग विझविताना एक शेतकरी गंभीररित्या भाजला होता. एकदा दुर्घटना घडल्यानंतर त्यावर उपाययोजना केल्या जातात. मात्र, मुंढे ग्रामस्थ गेल्या पाच वर्षापासून वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा करत असतानाही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना दाद दिलेली नाही. त्यामुळे आजच्या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण होते.
हातातोंडाशी आलेले पीक जळताना शेतकरी हतबल होऊन ते पाहत होते. त्याशिवाय त्यांच्यापुढे पर्यायच नव्हता. शेतकऱ्यांच्या या नुकसानीबद्दल वीज वितरण कंपनीला मात्र कसलेली सोयरसुतक नसल्याचे आज पहायला मिळाले. एवढी मोठी घटना घडूनही वीज वितरणचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आला नाही. केवळ दोन कर्मचारी उपस्थित होते. त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दरम्यान, प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी महसूल विभागातील दोन कर्मचाऱ्यांना पाठविले. त्यांना शेतकऱ्यांनी दुर्घटनेमागील कारणे सांगितली. तसेच जळालेल्या उसाची भरपाई न मिळाल्यास वीज वितरणविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा आणि प्रसंगी महामार्ग रोखण्याचा इशारा उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)