शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील आयडॉल अॅड. कोमल साळुंखे

महिला म्हणजे अबला, आधारासाठी तिचं इतरांवर परालंबवित्व.., असा समज खोडून काढत ऍड. कोमल साळुंखे यांनी महिलांबरोबरच वंचित घटकांना आधार दिला आहे. विशेष म्हणजे वडील माजी मंत्री अन्‌ शंभर शाळा चालविणाऱ्या संस्थेचे संस्थापक, सर्व सुखं पायाशी लोळण घेत असताना वंचितांसाठी त्या पदर खोचून उभ्या ठाकल्या आहेत. महिला सबलीकरणासह, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात त्यांचे अविरत कार्य सुरू आहे. सर्वसामान्यांना अल्पदरात कौशल्य विकासापासून ते उच्च शिक्षण मिळावे यासाठी भोसरीमध्ये राणी पुतळाबाई विधी महाविद्यालय आणि ओऍसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग सुरू करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडिलांकडून समाज सेवेचे बाळकडू
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या ऍड. कोमल या कन्या. लक्ष्मणरावांनी समाजकल्याण, पाणी पुरवठा अशा अनेक खात्यांची मंत्रिपदं भूषविली आहेत. त्यामुळे मुंबईत सरकारी बंगला, दिमतीला नोकरचाकर, मागे पुढे कार्यकर्त्यांचा जथ्था असा सगळा थाटमाट असताना ऍड. कोमल यांनी प्रतिष्ठेचा बडेजाव मिरवला नाही. वडिलांकडूनच त्यांना सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाले. मंत्रिपद असूनही चारचौघांसारख जीवन जगणारे लक्ष्मणराव यांच्या संस्कारात ऍड. कोमल घडल्या. माणसाच्या आयुष्यात कधी काय घडेल, याची शाश्‍वती नसते. त्यामुळे व्हीआयपी लाईफ पासून लक्ष्मणरावांनी कोमल यांच्यासह त्यांच्या तिन्ही भावंडांना कायम दूर ठेवले. कोमल आपल्या वडिलांनाच आदर्श मानतात. साधं, सरळ आयुष्य जगणाऱ्या लक्ष्मणरावांनी आपल्या मुलांवरही तसेच संस्कार घडविले. हे संस्कार, कोमल यांच्या वागण्या-बोलण्यातून पदोपदी जाणवते.

निराधारांना सावली फाउंडेशनचा आधार
शाहू शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लक्ष्मणराव ढोबळे यांनी गोरगरीब मुलांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली आहेत. त्यांचा हा वारसा आता ऍड. कोमल यांच्यासह त्यांची भावंड पुढे चालवत आहेत. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी स्थापन केलेल्या आश्रमशाळेत लक्ष्मणराव त्यांच्या तिन्ही मुलांना घेवून जात. तेथून त्यांच्यात वंचित मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी कार्य करण्याची ओढ लागली. इयत्ता अकरावीमध्ये असतानाच त्यांनी निराधार महिलांसाठी सावली फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनच्या माध्यमातून बचत गटांची उभारणी सुरू केली. अवघ्या सहा महिन्यात बचत गटांची संख्या तीन हजारांवर पोहचली. या माध्यमातून बचत गटांनी अनेक उद्योग उभारले आहेत. महिलांना लघुउद्योगांचे प्रशिक्षण दिले जाते. महिला मेळावा, मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून महिलांचे प्रबोधन केले जाते. महिलांना शासकीय योजनांचा लाभ घर बसल्या मिळवून दिला जातो. महिलांसाठी आरोग्य शिबिरे घेतली जातात. वैद्यकीय तपासण्या, उपचारांसाठी मदत केली जाते. उमंग महिला महोत्सवाच्या माध्यमातून 10 हजार महिलांची सभासद नोंदणी करण्यात आली. पाच हजार महिलांना मोफत पोस्टाचे बचत खाते उघडून देण्यात आले. त्यासोबत प्रत्येकी दोन लाखांचा अपघाती विमा उतरवून देण्यात आला. ग्रामीण भागातील गरजू महिलांना शेळी वाटप करण्यात आले. आजपर्यंत तब्बल एक हजार महिलांना शेळी वाटप करण्यात आले आहे. प्रत्येक महिलेला माहेरचा आहेर म्हणून साडी भेट दिली. महिला बचत गटांनी तसेच महिला लघुउद्योगांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सावली फाउंडेशच्या माध्यमातून शॉपिंग मॉल उभारण्याचा निर्धार ऍड. कोमल यांनी केला आहे.

शैक्षणिक विश्‍वातील ब्रॅंड
संगणक अभियंता असलेल्या अजय साळुंके यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर कोमल यांनी कायद्याचे शिक्षण घेतले हे विशेष. पुण्यात प्रिंटींग प्रेस व्यवसायात स्थायिक होऊन लक्षवेधी मासिकाचे काम हाती घेतले. ऍड. कोमल यांच्या सामाजिक कार्याला पती आणि सासू-सासरे यांचे भक्‍कम पाठबळ मिळत आहे. कायद्याची पदवी घेतल्यानंतर व्यवसायात उतरण्याऐवजी त्यांनी स्वतःला पुर्ण वेळ सामाजिक कार्यासाठी झोकून दिले. शाहू शिक्षण संस्थेच्या विश्‍वस्त म्हणून ताकदीने जबाबदारी पेलताना ऍड. कोमल यांनी काळाची गरज ओळखून शैक्षणिक धोरणे राबविली. ऊस तोड कामगारांच्या मुलांसाठी असलेल्या 20 शाळांमध्ये त्यांनी इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू केले. 2010 मध्ये पंढरपूर, मुंबई, कल्याण, औरंगाबाद आणि पुण्यात राणी पुतळाबाई विधी महाविद्यालय सुरू केले. शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले तर आजच्या स्पर्धेच्या युगात ही मुले कुठेही कमी पडणार नाही हे ताडून सीबीएससी अभ्यासक्रमाचे 20 ठिकाणी अनुलक्ष इंग्लिश मीडियम स्कूल सुरू करण्यात आले. आजमितीला शाहू शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्रभर 100 शाखा सुरू आहेत. दिव्यत्वाची प्रचिती ऍड. कोमल साळुंखे यांच्या प्रत्येक कृतीतून येते. शाहू शिक्षण संस्थेच्या भोसरी येथील शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून त्यांचा पिंपरी-चिंचवडला सहवास लाभला. अल्पावधीतच येथील शैक्षणिक विश्‍वातील त्या ब्रॅंड ठरल्या आहेत.

सर्वसामान्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ओऍसिस
इंद्रायणीनगरमधील राणी पुतळाबाई विधी महाविद्यालयाबरोबरच ऍड. कोमल यांनी ओऍसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंग आणि ओऍसिस इंग्लिश मीडियम स्कूल सुरू केले आहे. ओऍसिस इंग्लिश मीडियम स्कूलमुळे गोरगरीब मुलांना अल्पदरात इंग्रजी माध्यमातील शिक्षण मिळणे सोपे झाले आहे. ओऍसिस इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझायनिंगच्या माध्यमातूनही महिला सबलीकरणाचा धागा जपण्यात आला आहे. फॅशन डिझायनिंगसारखे प्रशिक्षण देताना नऊवारीपासून ते वेस्टर्न ड्रेसेसचे प्रशिक्षण याठिकाणी दिले जाते हे विशेष. ड्रेस डिझायनिंग, किडस्‌ वेअरचेही प्रशिक्षण याठिकाणी मिळते. वेळ आणि परिस्थितीअभावी महिलांना फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा असूनही त्यांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. खास त्यांच्यासाठी शॉर्ट कोर्सेस ओऍसिस इन्स्टिट्यूटने तयार केले आहेत. त्यामुळे नाममात्र शूल्कामध्ये पिंपरी-चिंचवडमधील महिला व युवतींना फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण उपलब्ध झाले आहे. ओऍसिस म्हणजेच वाळवंटातील हिरवळ. नावाला साजेसे काम इन्स्टिट्यूट माध्यमातून सुरू आहे, त्याचे श्रेय ऍड. कोमल साळुंके यांना जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)