शैक्षणिक सहलींच्या परवानगीकडे कानाडोळा

पुणे – शैक्षणिक सहलीच्या परवानगीसाठी तीन महिन्यात केवळ 15 कनिष्ठ महाविद्यालयांकडून पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव दाखल झाले आहेत. कागदपत्रांची परिपूर्ण पूर्तता करणाऱ्या प्रस्तावास तत्काळ मान्यताही देण्यात येत आहे.

शैक्षणिक सहलीच्या नियमावलीबाबत पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने ऑक्‍टोबरमध्ये परिपत्रक काढण्यात आले असून ते सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये या सर्वांना बजाविण्यात आले आहे. शैक्षणिक सहली पर्यटन, मनोरंजनात्मक, निसर्गरम्य अथवा अपघात स्थळी घेऊन जाण्यासाठी बंधन घालण्यात आले आहेत. शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक स्थळीच सहली घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार असून यासाठी परवानगी न घेता सहली काढल्यास मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. प्रस्तावासोबत बारा विविध प्रकारची कागदपत्रे सादर करणे आवश्‍यक आहे.

पुणे विभागातील काही महाविद्यालयांनी परिपत्रकाचा धसका घेऊन प्रस्ताव सादर केला आहे. त्यातील काही महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक महाविद्यालयांकडून अद्याप प्रस्ताव दाखल करून परवानगी घेण्यासाठी फारशी उत्सुकता दाखविण्यात येत नसल्याचेही स्पष्ट होऊ लागले आहे. काही महाविद्यालयांकडून परवानगी न घेताच सर्रासपणे सहली काढण्यात येऊ लागल्या आहेत.

शाळा व महाविद्यालयांनी रितसर परवानगी घेऊनच शैक्षणिक सहली काढाव्यात. नियम धुडकावून सहली काढल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत यांनी स्पष्ट केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)