शैक्षणिक आढाव्यासाठी लोणावळ्यात बैठक

पुणे – राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने विविध शैक्षणिक प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी राज्यातील विभागीय आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची लोणावळ्यात 4 व 5 जानेवारीला विशेष बैठक घेण्यात येणार आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध योजना राबविण्यास व जुन्या योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत सतत प्राधान्य देण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. अधिकाऱ्यांच्या सतत बैठका घेऊन अडचणी जाणून घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. नवीन वर्षाची सुरुवात होताच बैठकांचे सत्र सुरू करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. मंत्रालय किंवा पुण्यात बैठक घेण्याऐवजी आता थेट लोणावळा या पर्यटनस्थळीच बैठक घेण्यात येणार आहे. दोन दिवस पूर्ण वेळ या बैठका चालणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिक्षक भरतीसाठी सुरू करण्यात आलेले पवित्र पोर्टल, समग्र शिक्षा अभियान, आरटीई अंतर्गत 25 टक्‍केची प्रवेश प्रक्रिया, शालेय पोषण आहार, इ-लर्निंग प्रकल्प, प्रभावी शिक्षण पद्धतीत आधुनिक साहित्यांचा वापर, शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, शाळांनी सुविधांमध्ये सुधारणा करणे, शासकीय योजना अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविणे, नवीन शाळांना मान्यता, नवीन शैक्षणिक धोरणे यासह इतर प्रलंबित प्रश्‍नांवर चर्चा करून पुढील दिशा निश्‍चित करण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. शैक्षणिक दर्जा आणखी वाढविण्यासाठी यातून प्रयत्न केले जाणार आहेत.

स्थानिक पातळीवरील शिक्षणाधिकाऱ्यांच्या नेहमीच बैठका होत असतात. त्यामुळे या स्थानिक अधिकाऱ्यांऐवजी आता थेट राज्यातील सर्वच जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांनाच बैठकीला बोलावण्यात आलेले आहे. बैठकीला उपस्थित राहण्याच्या लेखी सूचनाही सर्वांना पाठविण्यात आलेल्या आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्‍त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी स्वत:च या बैठकीसाठी पुढाकार घेतलेला आहे. बैठकीत त्याच मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीच्या नियोजनाची व तयारीची प्रमुख सूत्रे ही शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहेत. शिक्षण विभागासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून समजले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)