शेवटच्या श्‍वासापर्यंत लावणी जीवंत ठेवणार

लावणी कलाकारांचा निर्धार, शासनस्तरावर लावणीकडे दुर्लक्ष

पुणे – दुरचित्रवाणी, स्मार्ट फोन यासारख्या माध्यमांमुळे आजच्या काळात लावणी मागे पडत आहे. लावणी हि जरी महाराष्ट्राची अस्सल कला असली तरी त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही आणि रसिकांना फिकीर नाही. परिणामी लावणी, तमाशा कलावंता समोरील अडचणी आणखी वाढत आहेत, हे वास्तव आहे. मात्र असे असले तरीही लावणी हेच आमचे पहिले आणि शेवटचे प्रेम असून शेवटच्या श्वासापर्यत लावणी जिवंत ठेवणार असल्याचा निर्धार सोमवारी लावणी कलाकारांनी व्यक्त केला.

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचच्या वतीने “रंग लावणीचे विचार मंथन कलारत्नांचे’ या लावणी कलाकारांशी आयोजित गप्पांच्या कार्यक्रमामध्ये तरुण आणि ज्येष्ठ लावणी कलाकारांनी प्रश्न मांडले. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, आशा काळे, रेश्‍मा मुसळे, मंगला बनसोडे, लावणी निर्माता संघाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पूना गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, अभय सरपोतदार आदी यावेळी उपस्थित होते. शोभा कुलकर्णी यांनी कलाकारांशी संवाद साधला.

मंगला बनसोडे म्हणाल्या, विठाबाई नारायणगांवकर यांच्याकडून मला लावणीचे बाळकडू मिळाले. वयाच्या सातव्या वर्षापासून मी लावणी करित आहे. मोबाईल आणि टिव्हीमुळे लोकांना घरबसल्या फुकटात कट मनोरंजन मिळत आहे, यामुळे अलिकडच्या काळात लोक लावणीसाठी आवर्जून वेळ काढत नाही, मागील काही वर्षांपर्यंत गावोगावच्या जत्रांमध्ये लावणी आणि तमाशाला प्रेक्षक मिळत, मोठ्या सुपाऱ्या मिळत असत मात्र आता तसे होताना दिसत नाही, त्यामुळे कलाकारांना आर्थिक संघर्ष करावा लागत आहे.
आशा काळे म्हणाल्या, नवीन पिढीपर्यत लावणी पोहोचविण्यासाठी आणखी प्रयत्न झाले पाहिजे. तरुण पिढीपर्यत विविध माध्यमाव्दारे लावणी पोहोचविली तर केवळ नृत्य कला नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे खऱ्या अर्थाने रक्षण होईल. लावणीसह लोककलांच्या रक्ष्णासाठी जतनासाठी शासकिय पातळीबरोबरच लोकसभागाचा आधार मिळणे आवश्‍यक आहे. मेघराज राजेभोसले म्हणाले, लावणी हि महाराष्ट्राची ओळख आहे. लावणी एक कला म्हणून टिकण्यासाठी लावणीला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयाचीही नितांत गरज निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)