शेवटच्या क्षणी विजय निसटला – पी व्ही सिंधू 

ग्लासगो – जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. जपानच्या नोझोमी ओकुहाराविरुद्धच्या अंतिम सामन्यात सिंधूने अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष केला होता. या सामन्याबाबत ती म्हणाली की, सामन्याच्या सुरूवातीला पकड मिळविल्यानंतर शेवटच्या क्षणी विजय माझ्या हातातून निसटत गेला.

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने निर्णायक गेममध्ये 20-20 अशी बरोबरी असताना केलेल्या चुकीचा उल्लेख करत सांगितले की, सुवर्ण पदक न जिंकल्याने मी निश्‍चितच दुःखी आहे. तिसऱ्या गेममध्ये 20-20 गुण असताना दोघांना सामना जिंकण्याची संधी होती. दोघींचेही लक्ष्य सुवर्ण पदक होते. मी त्याच्या खूपच जवळ होते. मात्र, शेवटच्या क्षणी सर्वकाही बदलून गेले.

आपल्या प्रतिस्पर्धीची स्तुती करत सिंधू म्हणाली की, ओकुहाराला हरविने सहज शक्‍य नव्हते. आतापर्यंत दोघिंमध्ये झालेले सामने हे संघर्षपूर्णच झालेले आहेत. हा सामनाही खूपच संघर्षपूर्ण होता. मी दिर्घ काळ सामना खेळण्यासाठी तयार होते. मात्र, मला वाटते ही आजचा दिवस माझा नव्हता.

एक तास 49 मिनिटांपर्यंत चाललेल्या चुरशीच्या सामन्याबाबत हैदराबादची खेळाडू म्हणाली की, मानसिक आणि शारीरिकदृष्टा हा सामना खूपच कठीण होता. या स्पर्धेतील हा सर्वात जास्त वेळ खेळला गेलेला सामना होता. मात्र, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील हा अंतिम सामना भारतीयांसाठी संतोषजनक राहिला. तसेच सायनानेही केलेल्या चांगल्या प्रदर्शनासह भारताने दोन पदके जिंकली आहेत. मला गर्व आहे की, मी देशासाठी रौप्य पदक जिंकले. या कामगिरीमुळे माझा आत्मविश्‍वास वाढला असून मी भविष्यात भारताला आणखीन पदके जिंकून देईन, असे सिंधूने सांगितले.
दरम्यान, कांस्यपदक विजेती सायना नेहवालने स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत नाराजी व्यक्त केली. सायना म्हणाली, माझा सामना दुसऱ्या सत्रात असेल, असे वाटले होते. मात्र तसे नव्हते आणि हे समजल्यावर मला आश्‍चर्य वाटले. दोन सामन्यांमध्ये किमान 24 तासांचे अंतर अपेक्षीत आहे. मात्र, हा वेळ कमी असल्याने मला विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. वेळेचा अभाव असल्याने कोणतीही तयारी करता आली नाही, असे लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या सायनाने सांगितले.

चौकट
बीएआयकडून रोख बक्षिसाची घोषणा
भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे (बीएआय) अध्यक्ष हिमांता विश्‍वा शर्मा यांनी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताला पदक मिळवून देणाऱ्या पी. व्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांना रोख पुरस्काराची घोषणा केली आहे. हिमंता यांनी महिला एकेरीत रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूला 10 लाख रुपये आणि कांस्यपदक जिंकणाऱ्या सायनाला पाच लाख रुपयांचे रोख बक्षिस जाहीर केले आहे.
सिंधूला रविवारी ग्लासगो येथे झालेल्या अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून 19-21, 22-20, 20-22 असा पराभव स्वीकारावा लागला होता. सिंधूने रौप्यपदक जिंकल्यानंतर हिमांता म्हणाले, यंदाच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत दोन पदके जिंकत भारताने विक्रमी कामगिरी केली आहे. मी सायना आणि सिंधू दोघिंचेही पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन करतो आणि कोचिंग स्टाफकडूनही त्यांचे अभिनंदन करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)