शेवगाव हत्याकांडातील आरोपी जेरबंद

नगर – बहुचर्चित शेवगाव येथील हरवणे कुटुंबाच्या हत्याकांडातील मुख्य आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे पोलिसांना यश आले आहे. याबाबतची माहिती अशी की, शेवगाव येथील विद्यानगर भागात हरवणे कुटुंबाची निर्घृणपणे हत्या करणारा कुख्यात आरोपी परसिंग हरसिंग भोसले (वय-29, रा. बाभुळखेडा, ता. नेवासा) हा कर्जत तालुक्‍यातील आखोणी या गावी त्याच्या नातेवाईकांकडे येणार असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी त्यांच्या पथकासह आरोपीला जेरबंद करण्यासाठी सापळा रचून आरोपी हा आखोणी गावातील त्याच्या नातेवाईकांच्या घराच्या मागील बाजूला झोपलेला आहे या माहितीवरून त्याठिकाणी छापा टाकला.

पोलिसांना पाहून आरोपी घराच्या बाजूस असलेल्या शेतात पळून जाऊ लागल्याने त्यावेळी त्याचा पाठलाग करून त्याच्यावर झडप घालत त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीकडे कसून चौकशी केल्यावर त्याने त्याच्या भावाच्या मदतीने शेवगाव येथील 4 लोकांची हत्या करून दरोडा टाकल्याची कबुली पोलिसांना दिली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये वॉंटेड असल्याची माहिती उजेडात आली आहे. या पथकातील कामगिरीत सपोनि शरद गोर्डे, लोळगे, शिंदे, पोहेकॉ काकडे, सुनील चव्हाण, उमेश खेडकर, अंकुश ढवळे, संदीप घोडके, संदीप पवार, विजय ठोंबरे, रावसाहेब हुसळे, मनोज गोसावी, विशाल दळवी, सूरज वाबळे, मलिकार्जुन बनकर, आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)