शेवगाव नगरपालिकेत सत्तांतर 

शेवगाव- नगराध्यक्षपदी भाजपच्या राणी मोहिते व उपनगराध्यक्षपदी वजीर पठाण यांची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते. ( छायाचित्र - भागवत बागडे )

नगराध्यक्षपदी भाजपच्या राणी मोहिते; राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक फुटले

शेवगाव – शेवगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या राणी विनोद मोहिते यांची निवड झाली. ग्रामपंचायतीपासून नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिकेत एक हाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीला पायउतार व्हावे लागले. उपनगराध्यक्षपदीदेखील भाजप सहयोगी गटबंधनाचे अपक्ष नगरसेवक वजीर बाबुलाल पठाण यांची निवड झाली. सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तीन नगरसेवक फुटल्याने नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीत भाजपच्या उमेदवारांना 12 तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नऊ मते मिळाली.

-Ads-

प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. नगराध्यक्षपदाची निवड भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली होती. नगराध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित असल्याने राष्ट्रवादीकडून अपक्ष नगरसेवक विजयमाला कैलास तिजोरे व भाजपच्या राणी मोहिते यांनी अर्ज दाखल केले होते. दोन्ही अर्ज वैध ठरले. हात उंचावून मतदान घेण्यात आले. त्यात तिजोरे यांना स्वत:सह, विद्या लांडे, यमुनाबाई ढोरकुले, सागर फडके, विकास फलके, भाऊसाहेब कोल्हे, पद्मा अधाट, वर्षा लिंगे, इंदुबाई म्हस्के अशी 9 तर भाजपच्या मोहिते यांना स्वत:सह, अरुण मुंढे, कमलेश गांधी, अशोक आहुजा, शारदा काथवटे, रेखा कुसळकर, सविता दहिवाळकर, नंदा कोरडे, अपक्ष वजीर पठाण यांच्यासह राष्ट्रवादीचे शब्बीर शेख, उमर शेख, अजय भारस्कर अशी 12 मते पडली. नगराध्यक्ष निवडीनंतरच भाजपची खेळी लक्षात आल्याने उपनगराध्यक्षपदाच्या निवडीचे चित्र स्पष्ट झाले होते.

उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून कमलेश गांधी, शारदा काथवटे व वजीर पठाण तर राष्ट्रवादीकडून अपक्ष नगरसेवक सागर फडके यांनी अर्ज दाखल केले. या चौघांचेही अर्ज वैध ठरले; मात्र गांधी व काथवटे यांनी अर्ज मागे घेतल्याने पठाण व फडके यांच्यात लढत झाली. त्यात पठाण यांना 12 तर फडके यांना 9 मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. बांदल यांनी नगराध्यक्षपदी मोहिते व उपनगराध्यक्षपदी पठाण यांची निवड जाहीर केली. निवडणुकीच्या कामकाजात मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नायब तहसीलदार दत्ता लोखंडे, अशोक वारे यांनी सहकार्य केले. पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

नगराध्यक्षपदी मोहिते विजयी झाल्याने पुढील उपनगराध्यक्षपदाच्या निकालाचीही दिशा स्पष्ट झाली. नगरपालिकेच्या कार्यालयाबाहेर भाजप व अपक्ष उपनगराध्यक्षांच्या कार्यकर्त्यांनी “आमदार मोनिका राजळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है,’ “जय भवानी जय शिवाजी’ व भाजपच्या विजयाच्या घोषणा देत भंडारा, गुलाल उधळीत फटाक्‍यांची आतिषबाजी केली. शिवाजी चौकात एकच जल्लोष केला. भाजपमध्ये उपनगराध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवक कमलेश गांधी व अरुण मुंढे यांनी कधी नव्हे, तो सामंजस्यपणा दाखवत आपसातील दुही बाजूला सारून एकीचे दर्शन घडवले. या निकालाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला चांगलीच चपराक बसली. निकालानंतर विजयी पदाधिकाऱ्यांसह शहरातून निघालेल्या मिरवणुकीत सर्वसामान्य सहभागी झाले होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरपालिकेवर भाजपने झेंडा फडकविल्याने आगामी राजकारणाच्या दृष्टीने भाजपला “अच्छे दिन’ आल्याचे संकेत मिळाले.

राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या गोटात 

मंगळवारी सायंकाळपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेते व नगरसेवकांबरोबर अज्ञातस्थळी असलेले राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक आज सकाळी आमदार मोनिका राजळे यांच्या कार्यालयात डेरेदाखल झाल्याने निवडणुकीचे चित्र पालटले. राष्ट्रवादीचे धाबे दणाणले. किमान एक तरी नगरसेवक परत फिरवण्याचा राष्ट्रवादीने केलेला प्रयत्न अखेरच्या क्षणी निष्फळ ठरला. उलट राष्ट्रवादीचेच तीन सदस्य भाजपच्या गळाला लागले आणि बहुमताचे पारडे फिरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आता तरी अंतर्मुख व्हावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)