शेवगावातील स्मशानभूमीतील अतिक्रमणे काढण्याची मागणी

शेवगाव: येथील मिरी रस्त्यावरील ईदगाह मैदान जवळील स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण काढून त्याला वॉल कंपाऊंड करून देण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भूखंडाचे श्रीखंड परस्पर लाटून माया जमवण्याचे काम शासकीय कर्मचारी व राजकीय पुढाऱ्यांच्या युतीतून ठिकठिकाणी सातत्याने चालू आहे. शेवगावही त्याला अपवाद नाही हेच या मुस्लिम बांधवांच्या मागणीवरून अधोरेखित होत आहे. कर्जतच्या तौसीफची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने या बाबीमध्ये लक्ष घालणे आवश्‍यक आहे.

यासंदर्भात मुस्लिम कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार या गट नंबरमध्ये ही 14 गुंठे जागा 1920 साली मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीसाठी तत्कालीन शासनाने दिली होती. आज जरी ती जागा शहराच्या मध्यवर्ती दिसत असली तरी 1920 साली येथे प्लेगची साथ आली होती तेव्हा प्लेगने मयत झालेल्या मुस्लिम बांधवांना गावाबाहेर दफन करण्यासाठी ही जागा दिली होती. शहराच्या वाढत्या विस्तारिकरणामुळे ही जागा आता शहराच्या मध्यवर्ती आली आहे. त्यामुळेच अनेकांनी ती चोहोबाजूंनी लाटण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी तेथे घरे, व्यावसायिक गाळे बांधून ती गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही या जागेत अनेक मुस्लिम कबरी आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अतिक्रमण केलेल्या मंडळींनी त्यांचे सांडपाणी या स्मशानभूमीत सोडल्याने कबरीची विटंबना होते, तसेच या पाण्यात डुकरे, मोकाट जनावरे हुंदडतात, कबरीला घासतात त्यामुळे मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या जातात. तरी येथे झालेले अतिक्रमण काढून शासकीय सातबारानुसार या 14 गुंठे जागेला वॉल कंपाऊंड करून मिळावे अशी विनंती करण्यात आली आहे. यासोबत सिटीसर्वे व गट नंबरचे नकाशे जोडले आहेत, तसेच मोजणी फी अर्जदार करण्यास तयार आहे असे नमूद करण्यात आले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पत्रकारांना देण्यात आल्या असून याकामी मदतीची याचना करण्यात आली आहे. या निवेदनावर सय्यद मेहराज बशीर, शेख मुनीर पठाण, शेख लाला बाबूभाई, शेख शहारूख, शेख मुनीर आदिंच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)