शेवगावला चोरीच्या 15 मोटारसायकली जप्त

शेवगाव – शेवगाव पोलिसांनी दोघा सराईत आरोपींना पकडून त्यांच्याकडून गेल्या तीन दिवसांत तब्बल 15 चोरीच्या मोटारसायकली जप्तीची कारवाई केली आहे. आणखीही काही मोटारसायकली हस्तगत होण्याची शक्‍यता पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी व्यक्‍त केली.

याबाबत अधिक माहिती अशी, येथील कार्यकर्ते किरण पुरनाळे यांच्या 31 जुलैला चोरी गेलेल्या मोटारसायकालच्या तपासात बुधवारी (दि.9) रात्री आठ वाजता मिरी रस्त्यावर मोटारसायकलस्वारांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी अमोल बबन बांदल (वय 28, रा. हनुमान टाकळी, ता. पाथर्डी) याला हटकले असता तो पळून जाऊ लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडील मोटारसायकल (क्रमांक एम.एच. 12, ए. झेड. 2557) ही चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. न्यायालयाकडून 14 ऑगस्टपर्यंत त्यास पोलीस कोठडी मिळाली.

तपासात त्याच्याकडून शेवगाव व इतर ठिकाणांहून चोरून आणलेल्या व विक्री केलेल्या, तसेच बेवारस सोडून दिलेल्या अशा एकूण 15 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्याचा साथीदार किशोर ज्ञानदेव सरोदे (रा.वडुले वाघोली, ता. शेवगाव) यासही संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने शिक्रापूर, वाघोली, शिरूर, राहुरी, नगर, पाथर्डी व शेवगाव येथे मोटारसायकलींची चोरी केल्याचे कबूल केले. त्यामुळे त्याच्याकडून आता आणखी बऱ्याच मोटारसायकली मिळण्याची शक्‍यता पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी व्यक्‍त केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक घनश्‍याम पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, उपनिरीक्षक सुहास हट्टेकर, हे. कॉ. महंमद युसूफ सय्यद, सुरेश टकले, पो.ना. रवींद्र शेळके, राजू चव्हाण, पो. कॉ. अशोक बागूल, पो. कॉ. राहुल नरवडे, अशोक काळोखे, वजीर शेख, राजेंद्र केदार यांच्या पथकाने कारवाई केली.

आता फिटरही रडारवर…
आरोपींनी काही मोटारसायकलींचे सुटे भाग करून ते विकून आपल्या तातडीच्या निकडी भागविल्या आहेत. ते घेणारे फिटरही आता पोलिसांच्या रडारवर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)