शेवंतीच्या “भाग्यश्री’ फुलाचा सुवास

यंदा प्रथमच आवक : प्रति किलो 200 ते 250 रुपयांचा भाव

पुणे, दि. 27 – शेवंती फुलाचा एक प्रकार असलेल्या भाग्यश्री फुलाची यंदा प्रथमच मार्केटयार्डात आवक झाली आहे. या फुलास चांगली मागाणी आहे. हे फुल पांढऱ्या रंगाचे आहे. फुलास घाऊक बाजारात प्रति किलोस 200 ते 250 रुपये भाव मिळत आहे.

फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले, शेवंती फुलातील राजा शेवंती आणि रतलम या दोन फुलांची आवक मार्केट यार्डात नेहमी होत असते. मात्र, आता शेवंतीमधील भाग्यश्री या तिसऱ्या प्रकाराची आवक झाली आहे. हे फूल प्रथमच पुण्यातील बाजारपेठेत दाखल झाले आहे. या फुलास विक्रेते आणि ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे, हे फूल टिकाऊ, जाड, पाकळीदार आणि चमकदार आहे. त्यामुळे ते ग्राहकांसह विक्रेत्यांचे लक्ष वेधून घेते. या फुलाचा हार आकर्षक बनतो. हार बनविण्यासाठीच या फुलांना सर्वाधिक मागणी आहे.
या फुलाचे यवत येथील उत्पादक शेतकरी विनायक शितोळे म्हणाले, आम्ही यंदा भाग्यश्री फूल लागवडीचा प्रयोग प्रथमच केला आहे. त्यामुळे किती उत्पन्न मिळेल, याचा अंदाज येणार नाही. मात्र, हे फूल पारंपारिक शेवंतीपेक्षा निश्‍चित जास्त उत्पन्न देईल. या फुलाचा आकार मोठा असून टिकाऊ आहे.
—————
सध्या गणेशोत्सव सुरू असल्यामुळे इतर फुलांप्रमाणे भाग्यश्री फुलासही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अर्धा एकर क्षेत्रावर या फुलाची लागवड केली असून, 4 ते 5 टन उत्पादन निघेल अशी अपेक्षा आहे. यवत परिसरात आम्ही एकट्यानेच या फुलाची लागवड केली आहे. जुन्नर परिसरातील पाच ते सहा शेतकऱ्यांनीही याची लागवड केली आहे. या फुलांचे एक रोप पाच ते सहा रुपयांस मिळते. अर्धा एकरमध्ये जवळपास चार हजार रोपांची लागवड केली आहे.
– विनायक शितोळे, फूल उत्पादक शेतकरी, यवत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)