शेलारमामा सुवर्णपदकासाठी “शाकाहारी’ची अजब अट मागे

पुणे – केवळ शाकाहारी आणि निव्यर्सनी विद्यार्थ्यांनाच “योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार ऊर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ दिले जाणार असल्याच्या विद्यापीठाच्या परिपत्रकावरून गतवर्षी मोठे वादंग निर्माण झाले होते. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शेलारमामा सुवर्णपदकासाठी शाकाहारीची अट मागे घेतली आहे. त्याप्रमाणे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करण्याच्या सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना केल्या आहेत.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय तथा विद्यापीठ विभागातील विज्ञान विद्याशाखा आणि विज्ञानेत्तर विद्याशाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांस दरवर्षी “हभप योगमहर्षी राष्ट्रीय किर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक’ प्रदान करण्यात येते. गेल्या वर्षी याच सुवर्णपदकासाठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंबंधी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकांमध्ये अटींची मोठी यादीच देण्यात आली होती. त्यात “विद्यार्थी हा शाकाहारी व निव्यर्सनी असावा,’ अशी अजब अट होती. त्यावरून विद्यापीठाला मोठ्या टिकेला सामोरे जावे लागले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्या पार्श्‍वभूमीवर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मागच्या वर्षी हे सुवर्णपदक तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यावर्षीच्या पदवीप्रदान समारंभात हे सुवर्णपदक कुणालाही देण्यात आले नाही. आता विद्यापीठाने दोन दिवसांपूर्वी परिपत्रक प्रसिद्ध करून नव्या नियम व अटीसह सुवर्णपदक प्रदान केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यातील शाकाहारी अट वगळण्यात आली आहे. अन्य नियम व अटी जुन्याच आहेत. या सुवर्णपदकासाठी संबंधित महाविद्यालय व विभागप्रमुखांनी पात्र विद्यार्थ्यांची आवश्‍यक माहितीपत्रे व शिफारशीसह दि. 15 नोव्हेंबरपूर्वी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडे अर्ज सादर करावेत, असेही विद्यापीठाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)