शेलपिंपळगावात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू

वाकी -विहिरीत पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चाकण – शिक्रापूर रस्त्यावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथे बुधवारी (दि. 25) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
समीर तान्हाजी मोहिते (वय 25, रा. शेलपिंपळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी माणिक मोहिते (वय 37, रा. शेलपिंपळगाव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. समीर हा बुधवारी (दि. 25) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गावातीलच एका पाणवठ्याच्या विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला तरी तो घरी न आल्याने त्याचा शोध घेतला असता, तो शेलपिंपळगाव येथील एका विहिरीतील पाण्यात अगदी तळाला बुडाला असल्याचे दिसले. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत उतरून समीर याला पाण्याबाहेर काढले. तातडीने त्याला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तपासणीपूर्वीच तो मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. येथील ग्रामीण रुग्णालयात त्याची उत्तरीय तपासणी व विच्छेदन करून अंत्यसंस्कारासाठी त्याचा मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शेलपिंपळगावच्या सरपंच विद्या मोहिते व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते यांचा समीर मोहिते हा पुतण्या होता. समीर याच्या आकस्मित मृत्युने शेलपिंपळगाव व परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चाकण पोलिसांनी आकस्मित मयत अशी नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल ढेकणे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)