शेती पंपासाठी वीज दरवाढीचे मोठे संकट : आ. पाटील

कराड, दि. 21 (प्रतिनिधी) – खाजगी शेतीपंपासाठी तसेच सहकारी पाणी पुरवठा संस्थांना महावितरणने प्रस्तावित केलेल्या वीज दर वाढीमुळे योजना अडचणीत येण्याची शक्‍यता असून शेतकऱ्यांवर एक मोठे संकट आले आहे. त्यास विरोध करण्यासाठी आपण वीज नियामक आयोगाकडे हरकती दाखल केल्या आहेत. वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री व उर्जामंत्री त्यांच्याकडे पत्र व्यवहार करुन या सहकारी पाणी पुरवठा योजनांना सवलतीचे दर लागू करण्याबाबत मागणी केलेली आहे. प्रा. डॉ. एन. डी. पाटील व वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांच्यासमवेत सहकारी पाणी पुरवठा संस्थांचा शासन दरबारी मोठा संघर्ष सुरू आहे. तथापि, सध्याच्या सरकारचा पश्‍चिम महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असून त्यासाठी प्रस्तावित केलेल्या वीज दरवाढी विरोधात जोरदार संघर्ष करण्यासाठी सर्वांनी डॉ. एन. डी. पाटील यांचे पाठीशी बहुसंख्येने उभे राहून या लढ्यात सामील व्हावे, असे आवाहन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
आरेवाडी, ता. कराड येथील श्री भाग्यलक्ष्मी सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन बाजीराव चव्हाण हे होते.
सभेच्या प्रारंभी व्हाईस चेअरमन पांडुरंग माने यांनी उपस्थितांचे स्वागत करुन श्रध्दांजली ठराव मांडला. सचिव आनंदा जाधव यांनी नोटीस वाचन केले. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले.
आ. पाटील म्हणाले, आदरणीय पी. डी.पाटीलसाहेब यांनी अडचणीवर मात करुन डोंगर कपारीवरील जमिनींना कोयना नदीचे पाणी उपलब्ध करुन दिले. या योजना उभ्या करताना अथक परिश्रम घेतले. त्या कार्यात बाजीराव चव्हाण (अण्णा) यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. त्यामुळे या परिसरात हरितक्रांती झाली. सध्या वीज दरवाढीमुळे योजना चालविताना अडचणी येत असून सवलतीच्या दरात वीज मिळावी, यासाठी शासन दरबारी माझा नेहमीच प्रयत्न असतो. व तो पुढेही चालू राहील. हुमणी किडीचा सामना करण्यासाठी कारखान्याच्या शेती विभागाने प्रसिध्द केलेल्या माहिती पत्रकानुसार कार्यवाही करावी. आणि त्याबाबत सभासदांनी दक्ष रहावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपस्थितांचे आभार पांडुरंग माने यांनी मानले. सभेस संचालक पी. डी. पाटील (दाजी), अनंत माळी, वामनराव साळुंखे, शेती अधिकारी मोहनराव पाटील यांचेसह आरेवाडी, गमेवाडी व डेळेवाडी येथील संस्थेचे सभासद उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)