शेतीसाठीचे आवर्तन मिळणारच

आमदार राहुल कुल; शेतकऱ्यांनी पाण्याबाबत काळजी करू नये

दौंड- खडकवासला धरणातून मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे एक आवर्तन कमी केले जाणार असून याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीत झाला असल्याचे सांगितले जात असले तरी मुळातच तीन आवर्तने सोडलीच जाणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
पुणे शहराकरिताच्या पिण्याच्या पाणी प्रश्‍नावर शेतीचे एक आवर्तन कमी करण्याबाबत विधानभवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हवेली, दौंड आणि इंदापुरातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दुष्काळी स्थिती असताना केवळ पुणेकरांकरिता मुबलक पाणी मिळावे, यासाठी आमच्या हक्काचे पिण्यासाठीचे, शेतीसाठीचे पाणी पळविले जात असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. या पार्श्‍वभुमीवर आमदार कुल यांनी पत्रकारांशी बोलताना सदर माहिती दिली.
आमदार कुल यांनी सांगितले की, पुणे शहराला मुबलक पाणी मिळावे याकरिता खडकवासला कालव्याचे शेतीकरिताचे एक आवर्तन कमी केले, अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. परंतु, कालवा सल्लागार समितीने दुष्काळ व पाण्याची कमतरता लक्षात घेत, रब्बीमध्ये दोन व उन्हाळी हंगामामध्ये दोन ऐवजी एक अशा प्रकारे तीन आवर्तनांचे शेतीसाठी व ग्रामीण भागांमधील पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी नियोजन यापूर्वीच केलेले होते. त्यामुळे शेतीच्या एक आवर्तनाची कपात मूळ नियोजनामध्येच करण्यात आली आहे. त्यानंतरही शेतीसाठीचे आवर्तन कमी करण्यात आले सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु, रब्बी आणि उन्हाळी हंगामातील आवर्तनाच्या नियोजन कुठलाही बदल झालेला नसून बैठकीत ठरल्यानुसार चार ऐवजी तीन आवर्तने शेतीकरिता तसेच पिण्याच्या पाण्याकरिता मिळणारच आहेत. यामध्ये नव्याने कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. शेतीसाठीच्या नियोजित 11.17 टीएमसी पाण्यामध्ये नव्याने कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे रब्बीचे एक आवर्तन पूर्ण झाले असुन दुसरे आवर्तन पुढील आठवड्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे. उन्हाळी आवर्तन नियोजनाप्रमाणे होणार असल्याचेही आमदार कुल यांनी सांगितले आहे.

  • खडकवासला कालव्यातून मिळणाऱ्या आवर्तनाचे नियोजन करताना दुष्काळीस्थितचा पूर्ण विचार करण्यात आला असून त्यानुसारच एक आवर्तन कमी करण्यात आले आहे. यानुसार तीन आवर्तने दिली जाणारच आहेत. शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी करू नये. योग्य वेळी आवर्तने सुटतील.
    – राहुल कुल, आमदार
  • पालकमंत्र्याचा पुणेकरांना खुष करण्याचा प्रयत्न…
    पुणेकरांना मुबलक पाणी मिळण्याकरिता खडकवासलातून शेतीकरिता सोडण्यात येणारे एक आवर्तन कमी केले जाणार असल्याचे विधानभवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री गिरीष बापट यांनी जाहीररित्या सांगितले होते. परंतु, याबाबतचे नियोजन यापूर्वीच झालेल्या बैठकांत झालेले आहे. यानुसार तीन आवर्तने सोडलीच जाणार आहेत. तरीही पालकमंत्र्यांनी केवळ पुणेकरांना खुष करण्याकरिता एक आवर्तन कमी झाले असल्याचा पुनर्रउच्चार केल्याची चर्चा आहे. परंतु, यामुळे तीन तालुक्‍यातील शेतकऱ्यांत मात्र धांदल उडाली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)