शेतीचा तास

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलेलो आहोत. त्याचबरोबर भारतातील 70% जनता ही खेड्यात राहते आणि शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे असेही भूगोलात शिकवले गेले. परंतु आज या डिजिटल युगात आधुनिकीकरणाची लाट आल्याने शहरीकरणाचा वेग झपाट्याने वाढू लागला. सुपीक जमिनीच्या जागी आज भल्यामोठ्या इमारती उभ्या राहिल्या आणि परिणामी हळूहळू कृषिप्रधानता ओहोटीला लागली. गेल्या आठवडाभरात झालेला शेतकरी संप संपूर्ण देशभरात प्रचंड गाजला. यात अनेक शेतकरी संपात सामीलही झाले. परंतु हा संप किती परिणामकारक होता, किंबहुना यातून साध्य काय होणार याबद्दल आजही शहरी भागातील जनता काही प्रमाणात अनभिज्ञ आहे.
याच संपाच्या काळात आलेला एक प्रसंग इथे जरूर शेअर करावासा वाटतो. असाच त्या दिवशी मी एका मित्राकडे त्याला भेटायला गेलो होतो. सुट्ट्यांचे दिवस असल्याने सर्व बच्चे कंपनी धमाल करत होती. आमच्या गप्पा सुरू होत्या. त्याची सात वर्षांची लहान मुलगी सिद्धी ही आमच्या समोरच बसून टीव्हीवर कार्टून पाहात होती. आमचा विषय सुरू झाला. मी त्याला म्हटलं, आपण सारे एकदा आमच्या गावी जाऊया. तिकडे जाऊन हुरडा पार्टी करूया. ती मुलगी आमच्याकडे कुतूहलाने पाहू लागली आणि आमच्या गप्पा मन लावून ऐकू लागली. तिने तिच्या बाबांना म्हणजेच माझ्या मित्राला विचारले, पप्पा हुरडा म्हणजे काय हो?
तो सांगू लागला, बेटा, शेतात जाऊन; हरभरा तोडून मग तो विस्तवावर भाजतात, त्याला हुरडा म्हणतात.
तिला फारसे समजले नाही. परंतु पुढे जाऊन ती म्हणाली, मी पण येणार हुरडा पार्टीला. पण मी नाही चढणार झाडावर. तुम्हीच मला हरभरा तोडून द्या.
आम्ही थोडे भांबावलो. मी तिला म्हणालो, बाळा हरभरा झाडावर नाही येत. ते तर एक छोटंसं रोपटं असतं. तू सुद्धा ते सहज तोडू शकशील.
आता मात्र प्रश्‍नयुक्त आठ्या घेऊन ती मला म्हणाली, नाही, मी ऐकलंय बऱ्याच जणांना बोलताना, की मला हरभऱ्याच्या झाडावर जास्त चढवू नको म्हणून.
आता मात्र घरात चांगलाच हशा पिकला. ती बिचारी मात्र निरागसपणे आम्हा सर्वांकडे पाहू लागली.
खरं तर केवळ पुस्तकातच शेती आणि शेतकरी याबद्दल वाचल्यामुळे सहसा त्याबद्दल म्हणावी तेवढी माहिती शहरी भागात नसते. आणि आज शहरीकरणाच्या विळख्यात घट्ट होत चाललेल्या समाजाला बळीराजा आणि त्याच्या कष्टातून फुललेली शेती याबद्दल काहीही माहिती नसते. आजची हीच लहान मुले उद्याचं भविष्य असणार आहेत आणि त्यांनाच जर याबद्दल सखोल माहिती नसेल, तर हे नक्कीच चिंतादायक असणार आहे. भुईमुगाच्या शेंगा किती उंच असतात? बटाटे आंब्यासारखे झाडाला येतात का? उसाचे बी कसे असते ? कांदे वेलीला येतात का? कलिंगडाच्या वजनाने झाड तुटत नाही का? अशा प्रकारचे अनेक प्रश्‍न आज या मुलांना पडलेले आहेत.
शेतामधी माझी खोप
तिला बोराटीची झाप
तिथं राबतो, कष्टतो
माझा शेतकरी बाप
ही कविवर्य इंद्रजित भालेरावांची कविता केवळ पुस्तकात शिकवून किंवा तोंडी सांगून तिचा अर्थपूर्ण बोध होणार नाही. त्यासाठी त्या कवितेतील शहारे आणणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा ‘याची देही याची डोळा’ अनुभव द्यायला हवा.
आम्ही शाळेला असताना पिरंगुटच्या शाळेत प्रत्येक वर्गाला आणि तुकडीला आठवड्यातून तीन तासिका या शेतीच्या तासासाठी दिल्या जायच्या. शाळेपासून 2 ते 3 किमी अंतरावर शाळेच्या शेतीपर्यंत चालत जावे लागायचे. त्यातून आम्हाला शेतकरी अनवाणी पायाने शेतापर्यंत कांदा भाकर कशी घेऊन जातो याचा धडा मिळायचा. तिथे गेल्यावर हातात खुरपे, कुदळ, फावडे, कोयता, कुऱ्हाड इ. शेतीच्या अवजारांपैकी वाटून घेऊन प्रत्यक्षात शेतात पेरणी, खुरपणी, लावणी, पाणी धरणे, पीक काढणे इ. कामे करून घेतली जायची. शालेय जीवनात वाटायचे केवळ श्रमदानाने महत्त्व पटावे म्हणून कदाचित शेतीचा तास असेल. पण आज कळतंय की त्यातून श्रमदानाबरोबरच शेतीचे महत्त्व, शेतीची गरज आणि शेती ही काळाची गरज आहे, याचे धडे आमच्या बालमनावर कोरले गेले.
आता अभ्यासक्रमात शेती आणि शेतकऱ्यावर केवळ कविता घेण्यापेक्षा विज्ञानाप्रमाणे प्रात्यक्षिकेही घ्यावीत. ज्या पिकांची माहिती शहरात प्रात्यक्षिकाद्वारे देता येणे शक्‍य नाही ती दृश्‍य स्वरूपात पडद्यावर दाखवावी. पालकांनी सुट्ट्यांच्या काळात केवळ पर्यटन स्थळांना भेटी देण्यापेक्षा शेती असल्यास गावी प्रत्यक्ष शेतात जाऊन मुलाबाळांना जिंवत अनुभव द्यावा. शेती नावाचा विषयच नर्सरी ते महाविद्यालयापर्यंत पर्यंत अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच शेतीचे तंत्रज्ञानही अभ्यासक्रमात शिकवले गेले पाहिजे.
केवळ शेतकरी जगला पाहिजे म्हणून आता चालणार नाही तो आपण जगविला पाहिजे. चला तर मग
कांदा-मुळा-भाजी ।
अवघीं विठाबाई माझी
म्हणत आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढून कधीतरी शेतीचा तास जॉईन करूया.
– सागर ननावरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)