शेतकऱ्यास जमिनीची आरोग्यपत्रिका द्यावी 

डॉ. विश्‍वनाथा ः खत व्यवस्थापनावर कार्यशाळा
 शेतकऱ्यांनी नफा- तोटा पत्रक तयार करावे
 खतविषयक जागृती आणणे गरजेचे
राहुरी  – पहिल्या हरितक्रांतीनंतर शेतीमध्ये आमुलाग्र बदल झालेले आहेत. शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहे. शेतीत सध्या रासायनिक खतांचा अतिवापर होत आहे. या विद्यापीठाने बहुतांशी पिकांच्या खतमात्रांसाठी शिफारशी दिलेल्या आहेत. परंतु त्यानुसार खतांचा उपयोग केला जात नाही. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यास जमिनीची आरोग्यपत्रिका द्यावी, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी केले. यासाठी दीपक फर्टिलायझरच्या सर्व विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना माती-पाणी परीक्षणासाठी प्रवृत्त करावे, असेही ते म्हणाले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि दीपक फर्टिलायझरच्या वतीने विद्यापीठात विक्री अधिकाऱ्यांसाठी खत व्यवस्थापन आणि विपणन विषयावर तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती.
समारोपप्रसंगी डॉ. विश्‍वनाथा म्हणाले, तुम्ही खत विक्रेता आहात पण जमिनीच्या तपासणीनुसार शेतकऱ्यास मार्गदर्शन करा. शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खतांबरोबरच इतर जैविक खतांची जागृती करणे गरजेचे आहे. शेतातील पालापाचोळा, कचरा, पिकांचे अवशेष यांपासून शेतकऱ्याने स्वतः खत तयार करावे. त्याचा वापर करावा. विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे म्हणाले, शेतकऱ्यांमध्ये रासायनिक खतांविषयी जागृती होणे गरजेचे आहे. शेतकरी फक्‍त खर्च करतो परंतु, पीक कापणी केल्यानंतर त्यांनी नफा-तोटा पत्रक तयार केले पाहिजे. एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब करावा जेणेकरुन एक पीक तोट्यात गेल्यास दुसऱ्यापासून त्यास फायदा होईल. प्रत्येक शेतकऱ्याने शेतीचा नफा-तोटा यावर अंदाजपत्रक तयार करावे. प्रास्ताविक संजय बिराजदार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. गोकुळ वामन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)