शेतकऱ्याच्या मुलीच्या जन्मावेळी सागासह 10 झाडांची रोपे भेट

मुलीच्या 18 वर्षांनंतर साग तोडायला परवानगी

मुंबई – वृक्ष लागवडीसाठी राज्य सरकारने नवा फंडा शोधला आहे. शेतकऱ्याच्या घरी मुलगी जन्माला आल्यास त्या कुटुंबाला राज्य सरकारकडून 5 साग, 2 आंब्याची आणि फणस, जांभुळ व चिंच अशी 10 झाडांची रोपटी भेट दिली जाणार आहे. या झाडांचे संगोपन केल्यावर मुलगी 18 वर्षें वयाची झाल्यानंतर सागाचे झाड तोडायला परवानगी मिळणार आहे. झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी वापरता येणार आहे. त्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कन्या वन समृद्धी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्यावरणाचे संतुलन सांभाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून यावर्षी शासनातर्फे 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष लागवडीबाबत सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच महिला सक्षमीकरणही साधले जावे यासाठी वन विभागातर्फे एक विशेष योजना तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत मुलगी जन्माला येणाऱ्या शेतकरी कुटुंबाला शासनाकडून 10 रोपे विनामूल्य देण्यात येणार आहेत. त्यात 5 रोपे सागाची, 2 रोपे आंब्याची आणि फणस, जांभुळ व चिंचेच्या प्रत्येकी एका रोपाचा समावेश आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठीच दिला जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचा संदेश देण्यासह मुलींच्या घटत्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र वनाखाली आणून वृक्षाच्छादन वाढविणे हाही या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत जन्म झालेल्या मुलींच्या पालकांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर त्यांना वन विभागाकडून 10 रोपे उपलब्ध करुन देण्यात येतील. लाभार्थींनी त्यांची लागवड 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत करावयाची आहे. या झाडांपासून मिळणारे उत्पन्न मुलींचे भवितव्य घडविण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ दरवर्षी दोन लक्ष शेतकरी कुटुंबांना होईल असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)