शेतकऱ्यांसाठी मार्च, एप्रिल आर्थिदृष्ट्याही कडक

शेतीच्या पाण्यासाठी मोठा खर्च; गाळ काढणे, विहिर खोलीकरणाची कामे सुरू

शेटफळगडे- शेतकऱ्यांकरिता मार्च ते मे महिन्यापर्यंतचा कालावधी पाणी तसेच आर्थिदृष्ट्या कडक मानला जातो. जिल्हा बॅंकेचे तसेच अन्य कर्ज फेडण्याकरिता मार्च, एप्रिल महिन्यांत धावपळ करावी लागते. तसेच याच कालावधीत पाणी कमी पडत असल्याने पीकांना पाणी उपलब्ध करण्याकरिताही कसरत करावी लागते. त्यानंतर शेतीकरिता लागणारे भांडवल आणि पाऊस लांबलाच तर होणारी परवड. यामुळे शेतीकरिता केवळ पाणीच नव्हे तर पाण्यासारखा पैसाही खर्च करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे.

इंदापुरात कालव्याची आवर्तने बंद झाल्याने विहिरींची पाणी पातळी खाली गेली आहे. काही ठिकाणी तर विहिरी कोरड्या पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी विहिर खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत, याचा खर्च मोठा आहे. ग्रामीण भागात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यातून मार्च ते मे महिन्यांच्या कालावधीत कडक उन्हाळा असून पाण्याची मोठी चणचण भासणार आहे. यामुळे विहिर खोलीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपत आला आहे. परंतु, नियमाप्रमाणे शेतातील ऊस तुटून गेला की, पुढच्या नोंदीसाठी ऊस लागवड करावी लागणार असल्याने शेतकऱ्यांपुढे पाण्याचा मोठा प्रश्‍न असणार आहे. ऊन आताच कडक जाणवू लागल्याने विहिरीतील पाणी कमी पडणार आहे. यामुळेच इंदापूर तालुक्‍यातील बहुतांशी शेतकऱ्यांनी शेतातील विहिरींचे खोलीकरण करणे, गाळ काढणे अशी खर्चीक कामे सुरू केली आहेत.

इंदापुरात गेली चार वर्षे समाधानकारक पाऊसच झालेला नाही. त्यामुळे उन्हाळ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावल्यास विहिरींची खोली वाढविली तरी पाणी पातळी कमीच राहणार आहे. या कामात पैसा खर्च करूनही पाणी वाढले नाही तर शेतकऱ्यांचे येथेही आर्थिक नुकसान होणार आहे. परंतु, शेतातील उभी पिके जगवण्याकरिता पाण्याच्या आशेने शेतकरी विहिर खोदाईची कामे करीत आहेत. इंदापूरच्या काही भागातून नीरा डावा कालवा व नीरा उजवा कालवा जातो. त्या भागातही कालव्याला आवर्तन बंद आहे. याउलट शेतकऱ्यांना वाढीव पाणीपट्ट्या दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)