शेतकऱ्यांनो सावधान : पिकांवर आता “अमेरिकन लष्करी अळी’चा प्रादूर्भाव

डॉ. अंकुश चोरमुले यांनी केली नोंद : सोलापूरात “मका’ पीक टार्गेट

पुणे – महाराष्ट्रात प्रथमच “अमेरिकन लष्करी अळी’ म्हणजेच “स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा’ या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. सिक्‍थ ग्रेन संस्थेचे कृषी सल्लागार डॉ. अंकुश चोरमुले यांनी राज्यात प्रथमच या किडीची नोंद केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसमधील तांदुळवाडी तेथील शेतकरी गणेश बाबर यांच्या शेतातील मका पिकावर या आळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे.

-Ads-

सिक्‍थ ग्रेन संस्थेतर्फे ऊस पिकाचे रिमोट सेन्सिंगद्वारे निरीक्षण करण्याचे काम पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. दरम्यान, सोलापुरात बाबर यांच्या शेतातील मका पिकात या अळीचा 40 टक्के प्रादूर्भाव झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या पिकातील अळ्यांचे नमुने रासायनिक प्रक्रिया करून ओळख पटविण्यासाठी नॅशनल ब्युरो ऑफ ग्रीकल्चरल इंसेक्‍ट रिसोर्स, बेंगलोर येथे पाठवले होते. डीएनए सिक्‍वेन्सिंग या पद्धतीनुसार या किडीचे विश्‍लेषण करून या किडीची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानुसार बाबर यांच्या पिकात सापडलेली ही अळी “फॉल आर्मी वर्म’ आहे, असा अहवाल डॉ. व्यंकटेश (प्रमुख शास्त्रज्ञ) यांनी सिक्‍थ ग्रेन संस्थेला दिला आहे.

याबाबत डॉ. चोरमुले म्हणाले, स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा कीड ही मुळात अमेरिकेतील मका पिकाची पाने खाणारी कीड आहे. सुमारे 80 पिकांवर ही कीड आपली उपजीविका करते. मात्र, मका पीक हे तिचे यजमान पीक आहे. सर्वप्रथम आफ्रिकमधील नायजेरिया देशात 2016 साली ही अळी आढळली. आफ्रिका खंडात या किडीमुळे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भारतात सर्वप्रथम शिमोगा विद्यापीठाच्या प्रक्षेत्रातील मका पिकावर ही कीड दिसून आली. त्यानंतर कर्नाटकातील चिकमंगलूर, चित्रदुर्ग, दावणगिरी या जिल्ह्यात या किडीचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला.

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही कीड तशी नवीन आहे. सध्यातरी या किडीचा प्रसार रोखणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी नियमित मका पिकाचे निरीक्षण करून ही कीड दिसून आल्यास संयुक्त किटकनाशकांचा वापर करावा.
– डॉ. अंकुश चोरमुले, कृषी सल्लागार

असे होते नुकसान
कीड मका पिकाचे पाने खाते. प्रथम अवस्थेतील अळी ही कोवळ्या पानांवर आपली उपजीविका करते. एका बाजूने खरवडून खाल्ल्यामुळे पानांवर पांढरे ठिपके दिसून येतात. दुसऱ्या-तिसऱ्या अवस्थेतील अळी ही पानाच्या कडेपासून शिरेकडे पान खात जाते. ही कीड स्वजातीय भक्षक असल्यामुळे मक्‍याच्या एका झाडावर एक किंवा दोन अळ्या असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या झाडाची पूर्ण पाने खाऊन फक्त पानांच्या शिरांना शिल्लक ठेवतात. पोंग्यामध्ये असताना जर, किडीचा प्रादूर्भाव झाल्यास पान उघडल्यानंतर पानावर एका रांगेत गोल छिद्रे दिसून येतात. सुरूवातीच्या काळात पोंग्यामध्ये प्रादूर्भाव कमी असतो. मात्र, नंतरच्या अवस्थेच पूर्ण पोंग्याचे नुकसान होऊ शकते. मक्‍याच्या एका झाडावर एक अळी असेल तर, उत्पादनात सुमारे 5-20 टक्‍क्‍यांपर्यंत घट होते.


राज्यभर प्रादूर्भाव होण्याचा धोका
या किडीचे पतंग ताकदवान असून एका रात्रीत हा पतंग जवळजवळ 100 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकते. त्याचबरोबर या किडीची प्रजनन क्षमता जास्त आहे. एक मादी तिच्या जीवनक्रमात सुमारे 1-2 हजार अंडी घालते. महाराष्ट्राचा विचार करता, मका पिक हे कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र घेतले जाते. त्यामुळे ही कीड इतर भागात पसरण्याची शक्‍यता जास्त आहे. मका पिकाबरोबर ऊस, कापूस ही पिकेदेखील या किडीची यजमान पिके आहेत. त्यामुळे भविष्यात ऊस, कापूस पिकांवर प्रादूर्भाव झाला आणि ही अळी स्थिरावली, तर नगदी पिकांच्या शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागेल.


केंद्रीय कीडनाशक मंडळाने दि. 10/08/2018 रोजी शिफारसीत केलेली कीटकनाशके खालील प्रमाणे.
मका पिकात या कीटकनाशकांची शिफारस फक्त या हंगामासाठी करण्यात आली आहे.
1) क्‍लोरोअँट्रानिलीप्रोल 18.5 एससी किंवा थायमिथोक्‍झाम 12.6+ लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5 टक्के झेडसी
2) नोमुरिया रिलेयी (4 ग्रॅम प्रती लिटर पाणी) या जैविक कीटकनाशकाची फवारणीदेखील या किडीवर उपयुक्त ठरते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)