शेतकऱ्यांना पीके वाचविण्यासाठी मागणीनुसार वीजपुरवठा – चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर – अनियमित व अपुऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत असल्यामुळे शेतातील पीके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांसाठी लोडशेडींग कमी करून आवश्‍यकतेनुसार विजेचा पुरवठा करण्यात येईल. शेतकऱ्यांनीही उपलब्ध पाण्याचे नियोजन करुन पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

मौदा तालुक्‍यातील रेवराल येथे सुमारे 95 लाख 73 हजार रुपये खर्च करुन मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत पुरक पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात येणार असून या योजनेचे भूमिपूजन बावनकुळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशा सावरकर होत्या. यावेळी माजी सभापती टेकचंदजी सावरकर, अशोक हटवार, सदानंद निमकर, चांगोजी तिजारे आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात शुध्द पिण्याचे पाणी पुरवविण्यासाठी मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या माध्यमातून योजना राबविण्यात येत असल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की, ग्रामीण जनतेला आरओ असलेले पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महिला बचतगटाच्या माध्यमातून शुध्द जलयंत्र बसविण्यात येत आहे. केवळ पाच रुपयामध्ये 25 लीटर पाणी उपलब्ध होत असल्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत नाही. येत्या वर्षात ही योजना पूर्ण करुन येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्‍यकतेनुसार वीज उपलब्ध करुन देण्याची ग्वाही देताना ते पुढे म्हणाले की, सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक गावात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यात येणार असून तलाव, शेततळे, बंधारे आदी ठिकाणी पाणी अडवून या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येऊन शेतीला आवश्‍यकतेनुसार पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. शेतकऱ्यांनीही यासाठी पुढाकार घेऊन जलसंधारणाच्या कामाला गती द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबद्दल बोलताना म्हणाले की, कर्जमाफी मिळणाऱ्या तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 15 स्पटेंबर पूर्वी जवळच्या सेतू केंद्रात ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला असून या योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी पहिल्यांदाच 595 कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ 150 कोटी रुपये उपलब्ध होत होते. रेवराल येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासंदर्भातही पुढाकार घेऊन याला केंद्र व राज्य शासनाची परवानगी घेण्यात येईल, अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)