शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर खरेदीवरील जीएसटी रद्द करा

-सातारा पंचायत समिती सभेत ठराव
-पात्र लाभार्थींना अनुदान देण्याची मागणी

सातारा – अन्नदाता शेतकऱ्याला ट्रॅक्‍टर खरेदीवरील जीएसटी रद्द करण्याचा ठराव सातारा पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. त्याचबरोबर मागील वर्षी कृषी योजनेतून ट्रॅक्‍टर खरेदीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळाले नसून त्यांची सरकारने फसवणूक केली असल्याचा आरोप सभापती मिलींद कदम यांनी यावेळी केला.

दरम्यान सभेत कृषी पर्यवेक्षकांनी मागील वर्षी कृषी अवजारांसाठी अनुदान प्राप्त झाले नसल्यामुळे पात्र लाभार्थींची यादी रद्द करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यावर सभापती मिलींद कदम संतप्त झाले व म्हणाले, शेतकऱ्यांना कृषी अवजारे व ट्रॅक्‍टर खरेदीसाठी प्रस्ताव करण्यासाठी अनेक कागदपत्रे गोळा करण्यास सांगितले जाते आणि त्यानंतर लकी ड्रॉ व्दारे शेतकऱ्यांची निवड करण्यात येते.

मागील वर्षी जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला असून अद्याप त्यांना अनुदान न देणे व आता यादीच रद्द करणे म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूकच करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी विभागाने शासनाला सभागृहाचे म्हणणे कळवून पात्र लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी मागणी कदम यांनी केली.

तर उपसभापती जितेंद्र सावंत यांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर खरेदीसाठी सरकार यापुर्वी 25 टक्के अनुदान देत असले तरी दुसऱ्या बाजूला ट्रॅक्‍टर खरेदीवर तब्बल 28 टक्के जीएसटी सारखा कर वसूल केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टर खरेदीवरील जीएसटी रद्द करण्याचा ठराव करण्यात यावा अशी मागणी जितेंद्र सावंत व आशुतोष चव्हाण यांनी केली. त्यानंतर सभागृहाने एकमताने ठराव मंजूर केला.

तसेच यावेळी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सदस्यांनी शेतकऱ्यांना जागृत करायला हवे असे कृषी पर्यवेक्षकांनी सांगितले. त्यावर सदस्यांनी, पीक नुकसानीचे पंचनामे नीट होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कामाचा आढावा सादर करण्यास उभा राहताच सभापती मिलींद कदम यांनी पाणी गळतीचा मुद्दा उपस्थित केला.

तसेच शासनाने एका बाजूला दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले असताना प्राधिकरण मात्र, पाणी गळती दूर न करता शासनाच्या आवाहनाला हरताळ फासत आहे. त्यामुळे ज्या ठेकेदारांकडे पाणी गळती दूर करण्याचे काम दिले आहे त्यांना पुढील बैठकीत हजर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्याला दिल्या.

तर संजय पाटील यांनी शाहुपुरीतील आझादनगर, गंगासागर कॉलनीत सतत पाणीपुरवठा विस्कळीत होत असून तक्रारी केल्यानंतरच पुरवठा करण्यात येत आहे. तरी अधिकाऱ्यांनी गांभिर्याने लक्ष घालून परिसरातील तक्रारी येता कामा नयेत, अशा सूचना पाटील यांनी केल्या. तसेच यावेळी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सातारा तालुक्‍यातील पाणंद रस्त्यांसह इतर कामे मार्गी लावण्याची मागणी सदस्यांनी केली. त्यावर सभापती मिलींद कदम यांनी पुढील आठवड्यात सर्व ग्रामसवेकांची एकत्र बैठक घेवून रोजगार हमीची कामे वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले.

सभापती, उपसभापतीच अधिक आक्रमक
मासिक सभेत अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो. सभेमध्ये सदस्यांनी प्रश्‍न उपस्थित करणे आणि त्यावर संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी व सभापती, उपसभापतींनी उत्तरे देणे हा कार्यभाग आहे. मात्र, सातारा पंचायत समितीच्या सभेत उलटा प्रकार घडताना दिसून आला. सभेमध्ये सदस्यांनी म्हणणे मांडण्याऐवजी सभापती व उपसभापतीच विभाग प्रमुखांना धारेवर धरताना दिसून येत होते.

तुम्ही नाष्टा घ्या आणि निवांत बसा

बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्‍यामध्ये मंजूर कामांची संख्या सदस्यांना सांगितली. त्यावर सदस्यांनी कामांची यादी वाचून दाखवा असे सांगताच अधिकाऱ्यांनी ती यादी सोबत आणली नसल्याचे सांगितले. त्यामुळे सभापती मिलींद कदम संतप्त झाले व म्हणाले, ही आढावा बैठक आहे, आपण सोबत यादी आणायला हवी होती असे सूचित करताच सदस्यांनी त्या अधिकाऱ्याला तुम्ही नाष्टा घ्या आणि निवांत बसा असे सांगताच सभागृहात हशा पिकला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)