शेतकऱ्यांना खते, बियाणांचा पुरवठा वेळेत करा

पालकमंत्री बापट यांच्या अधिकाऱ्यांना सूचना 


जलयुक्‍त शिवार अभियान आढावा बैठक

पुणे – यंदा खरीपाच्या एकूण 2 लाख 31 हजार हेक्‍टर जमिनीवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

विधान भवन सभागृहात खरीप हंगाम 2018 आढावा व जलयुक्‍त शिवार अभियान आढावा बैठक पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी आमदार भिमराव तापकीर, संजय भेगडे, सुरेश गोरे, राहुल कूल, जिल्हाधिकारी सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक विजयकुमार इंगळे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री बापट म्हणाले, रासायनिक खत विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण या कार्यपद्धत्तीने जिल्ह्यातील 932 किरकोळ विक्रेत्यांकडे पी. ओ. एस. मशीन कार्यान्वित करण्यात आली आहेत. या सर्व विक्रेत्यांवर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून शेतकऱ्यांना खत पुरवठा होईल याची खबरदारी घ्यावी. रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांच्या वापर वाढण्यासाठी देखील प्रोत्साहन देऊन योग्य पद्धतीने नियोजन करावे. मागेल त्याला शेततळे हा शासनाचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे.

याअंतर्गत 2016 ते 2018 या कालावधीत एकूण 1 हजार 989 शेततळे पूर्ण झालेली आहेत. सन 2017-18 या वर्षात पुणे ग्रामीण मंडळ अंतर्गत 1 हजार 296 कृषी पंप वीज जोडण्या दिल्या असून प्रलंबित वीज जोडणीसाठी 29 हजार 421 कोटी रक्कमेचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे. प्रलंबित कृषी पंपांना वीज जोडणी देण्यासाठी पुरेशा क्षमतेने कार्यवाही करावी, अशा सूचनादेखील त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावाही बापट यांनी घेतला.

मागील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करावीत. तसेच या वर्षातील कामे तात्काळ सूरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे. विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी देखील समन्वय राखून प्रलंबित कामे पूर्ण करुन घ्यावीत, अशा सूचनाही बापट यांनी यावेळी दिल्या. जिल्हाधिकारी राव यांनी जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील 60 टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. उर्वरीत काम देखील युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात येणार आहे. याबरोबरच 274 ठिकाणी गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले असल्याने एप्रिल अखेर पुणे जिल्ह्यात टॅंकरची आवश्‍यकता भासणार नाही. लोकप्रतिनिधींच्या सहकाऱ्याने उर्वरीत ठिकाणीदेखील गाळ काढण्याचे काम सुरु करुन ते तात्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना देखील त्यांनी दिल्या.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब अलगढमल यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगाम नियोजनाची माहिती दिली. सन 2018-19 मध्ये संभाव्य पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार खरीप पिकांचे नियोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी खरीप हंगामाच्या दृष्टीने विविध सूचना केल्या. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)