शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलाय का? (भाग एक)

गेल्या काही वर्षात पेट्रोल-डिझेलबरोबरच सर्व प्रकारची खते, औषधे, बी-बियाणे, मजुरी, शेतीउपयोगी साधने आदींच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पशुखाद्याच्या किमती तर कमालीच्या वाढल्या आहेत. असे असताना शेतमालाच्या आणि दुधाच्या दरामध्ये त्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळत नाही. शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी अनेक वर्षापासून शेतकरी आणि विविध संघटना करताना दिसतात. मात्र, याकडे कोणतेही सरकार लक्ष देत नाही.

भारत हा कृषिप्रधान देश असून 70 टक्के नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. देशाचे माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ म्हणून सांगितले होते. महात्मा फुले यांनीही शेतकर्यांना जास्त महत्व दिले होते. एवढ्या महान व्यक्तींनी शेतकऱ्यांनाच केंद्रबिंदू मानले होते. मात्र त्यानंतर कोणीही शेतकर्याकडे लक्ष दिले नाही. आज देश स्वतंत्र होऊन 70 वर्षे होत आली. मात्र येथील शेतकरी अद्याप स्वतंत्र झाला आहे का, असा प्रश्न आता निर्माण झाला असून सध्याच्या परिस्थितीमुळे शेतकर्यांना कोणीही वाली राहिला नसल्याचे चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच्या सरकारने साठ वर्षात हळूहळू नुकसान केले, मात्र सध्याच्या सरकारने अडीच-तीन वर्षातच पूर्वीच्या सरकारप्रमाणे नुकसान केले असल्याचे विधान केले होते. त्याप्रमाणे सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण सुरु आहे. केवळ बड्या उद्योगपतींच्या फायद्याचे निर्णय हे शासन घेत असून शेतकऱ्याला पूर्णपणे गाळात गाडण्याचा प्रकार सुरु आहे. अनावश्‍यक योजनांवर लाखो कोटी रुपये खर्च होत आहे. मात्र, शेतमालाला हमीभाव देण्याची दानत यांच्यामध्ये नाही. गेल्या तीन वर्षात तर कोणत्याही शेतमालाला बाजारभाव मिळाला नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीत आला असून या काळात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही वाढले आहे.

तरीही या शासनाचे डोळे उघडत नाहीत. एक मार्ग असतानाही हजारो कोटी रुपयांचा समृद्धी महामार्ग करण्याचा घाट हे शासन घालत आहे. मूठभर व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करून मुंबई-गुजरात बुलेट ट्रेनचा प्रस्ताव, अनेक उद्योगपतींना लाखो कोटी रुपयांची कर्जमाफी केली, त्यांना सवलती दिल्या आहेत. यातील काही उद्योगपती देश सोडून पळाल्याची उदाहरणे आहेत. मात्र आपल्या शेतात काबाडकष्ट करून देशातील नागरिकांचे पोट भरणाऱ्या बळीराजाला काही हजार रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ येत असून ही बाब या शासनाला भूषणावह नाही.

 गणेश घाडगे 
  नेवासा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)