शेतकऱ्यांना कोणी वाली राहिलाय का? (भाग दोन )

गेल्या काही वर्षात पेट्रोल-डिझेलबरोबरच सर्व प्रकारची खते, औषधे, बी-बियाणे, मजुरी, शेतीउपयोगी साधने आदींच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. पशुखाद्याच्या किमती तर कमालीच्या वाढल्या आहेत. असे असताना शेतमालाच्या आणि दुधाच्या दरामध्ये त्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळत नाही. शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी अनेक वर्षापासून शेतकरी आणि विविध संघटना करताना दिसतात. मात्र, याकडे कोणतेही सरकार लक्ष देत नाही.

गेल्या काही वर्षात कांदा, टोमॅटोसारख्या पालेभाज्या, फळभाज्या तसेच सर्वच भाज्यांचा खर्चही शेतकर्यांना वसूल झाला नाही. आता तर द्राक्ष, डाळिंबासारख्या फळांनाही बाजारभाव नसल्याने शेतकर्यांनी कोणती पिके घायची हे आता शासनानेच सांगण्याची गरज आहे. शेतीपूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय महत्त्वाचा आहे. मात्र, सध्या दुधालाही बाजारभाव नसल्याने जनावरांच्या चारा-पाण्याचा खर्चही यातून मिळत नसल्याचे चित्र आहे. सर्वच बाजूंनी शेतकरी अडचणीत आला असून शेतकऱ्यांच्या मतावर राजकारण करणारी नेतेमंडळीही त्यांच्या बाजूने राहिली नाही.

2017 मध्ये महाराष्ट्रात शेतकरी संपावर गेला होता. मात्र हा संप मोडीत काढण्याचे प्रयत्न राजकारणी लोक करीत होते. पहिल्याच दिवशी यात ते यशस्वी झाले. मुंबई वगळता इतर ठिकाणी बंद सुरु राहणार असे सांगण्यात येत असले तरी मुंबई वगळल्याने या संपामध्ये किती बळ राहिले हे पाहणे देखील महत्वाचे होते. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असणार्या या शहरात संपाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. त्यामुळे हे सरकार घाबरले आणि आंदोलकांमध्ये फूट पाडून बंदमधून मुंबई वगळण्यात त्यांनी यश मिळवले होते. तेथील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या काही प्रतिनिधींच्या कानात कोणता मंत्र दिला की ज्यामुळे त्यांनी कोणाही शेतकर्याशी चर्चा न करता यातून मुंबई वगळल्याचे सांगितले. पाच दिवसांच्या या संपामुळे अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

भाजीपाला, पिके शेतातच खराब झाली. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला. संपाचा फटका मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांनाच बसला. संप मिटल्यावर एकाच वेळी मार्केटला भाजीपाला, फळे आल्याने पुन्हा बाजारभाव गडगडले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या की नाही हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. इतक्‍या दिवस संप करून शेतकर्यांना काय साध्य झाले, फक्त नुकसान. एकीकडे शहरातील नागरिक खाणे-पिणे व करमणुकीवर हजारो रुपये खर्च करतात. पण भाजीपाला किंवा दुधाचा भाव काही रुपयांनी वाढल्यास सगळीकडे ओरड करतात.

त्यामुळे नागरिकांनी आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण पेरणी केल्यावर लगेच दुसर्या दिवशी कोणताही शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणता येत नाही. त्यासाठी त्याला काही आठवडे-महिन्यांचा वेळ लागतो आणि या काळात शेतकरी आपल्या शेतात रात्रंदिवस काबाडकष्ट करीत असतो याची जाणीव शहरातील नागरिकांना आणि सरकारलाही असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांमध्ये आणि त्यांच्या संघटनांमध्ये एकी नाही. अशा वेळी आंदोलनात फूट पाडण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जातात आणि यामुळे शेतकर्याचे नेतेही शेतकऱ्यांबरोबर राहत नाहीत. त्यामुळे शेतकर्यांना कोणी वालीच राहिला नाही असे म्हणण्याची वेळ आली आहे.

  गणेश घाडगे 
    नेवासा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)