शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आणण्यास कटिबद्ध – सुभाष देशमुख

पुणे – उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी, असे आपल्याकडे म्हटले जाते. मात्र, उत्तम शेती असूनही आतापर्यंत शेती करायला कोणी का येत नाही? असा भावनिक सवाल सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केला. शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. त्यांना चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासाठी सरकार, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ व उद्योजकांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कृषी महाविद्यालयामध्ये आयोजित कृषी परिषदेमध्ये देशमुख बोलत होते. यावेळी पशु व दुग्धमंत्री महादेव जानकर, सहकार व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपच्या प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे डॉ. रमेश हापसे, आमदार स्मिता कोल्हे, उद्योजक अनिल घोडावत आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली पाहिजे, असे सारेच बोलतात. मात्र, शेतकऱ्यांचे आजचे चित्र बदलायचे असेल तर, उद्योजकांनी कृषी क्षेत्रात येऊन शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे. शेतकरी मजबूर झाला आहे. उत्पादक त्यांच्या मालाची किंमत ठरवतात मात्र, त्यांना त्याच्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार नाही. शेतकरी ते ग्राहक यांच्यामधील दलालाची यंत्रणा काढून ग्राहकाला चांगला शेतमाल व शेतकऱ्याला चांगला भाव मिळण्यासाठीची यंत्रणा भाजप सरकार करीत आहे. शेतमालाला किमान बाजारभावाची आवश्‍यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.
शेतमालाला दुप्पट भाव कसा द्यायचा? हे काही फक्त घोषणा करून होणार नाही; तर देशातील शास्त्रज्ञ, प्रशासन व सरकार यांनी एकत्र येऊन काम करून त्यावर संशोधन केले पाहिजे. त्याची अंमलबजावणी केली पाहिजे, असे महादेव जानकर यांनी सांगितले. शेतकरी पिकवायला शिकला मात्र, ते विकायला शिकला नाही. योजना ही मलमपट्टी आहे. मागणी व पुरवठा याचे गणित लक्षात घेऊन यापुढे उत्पादन करावे लागेल असे सहकार व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)