शेतकऱ्यांच्या विकासासाठी कार्यरत महात्मा फुले कृषि विद्यापीठ…

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्याचा सर्वांगीण विचार केला असता असे जाणवते की, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान हे शेतकरीभिमुख असून ज्या शेतकर्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन या शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे. 

राहुरी येथे ‘महाराष्ट्र कृषि विद्यापीठ’ या नावाने कृषि विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर 1969 साली थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावाने हे कृषि विद्यापीठ ‘महात्मा फुले कृषि विद्यापीठ’ या नावाने उदयास आले. पश्चिम महाराष्ट्रातील 10 जिल्हयांचे कार्यक्षेत्र असलेल्या या कृषि विद्यापीठामध्ये कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून कामकाज चालते.

विद्यापीठाच्या अतुलनीय कार्यामुळे राज्यातील नव्हे तर पूर्ण देशातील कृषि विद्यापीठांना एक दीपस्तंभ ठरत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या शेतकरीभिमुख अभूतपूर्व कार्यामुळे विद्यापीठास आजपर्यंत सरदार वल्लभभाई पटेल सर्वोकृष्ट कृषि विद्यापीठ पुरस्कार (2002), देशातील उत्कृष्ट संस्था म्हणून 100 कोटी रुपयांचे विशेष पारितोषिक (2008), देशातील सर्वात पसंतीची संस्था (2009) यासारख्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कृषि शिक्षण – कृषि विकास साधावयाचा असेल तर कृषि साक्षरता खूपच महत्वाची आहे. कृषि साक्षरतेसाठी विद्यापीठामार्फत कृषि पदविका, कृषि पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचे शिक्षण दिले जाते. या विद्यापीठाचे विद्यार्थी कृषि क्षेत्रात, शास्त्रज्ञ म्हणून, प्रगतशील शेतकरी म्हणून, प्रशासक म्हणून, समाजसेवक म्हणून राज्यात व देशात चमकताना दिसतात.

शेतकरीभिमुख कृषि संशोधन कार्य – शेतीशी निगडीत संशोधन करण्यासाठी विद्यापीठ मध्यवर्ती परिसराशिवाय पश्चिम महाराष्ट्रात 28 संशोधन केंद्रे आहेत. संशोधनात विद्यापीठाचे योगदान मोलाचे असून गेल्या 49 वर्षामध्ये अन्नधान्य, फळेफुले, चारापिके यांचे 257 हून अधिक वाण विकसित केले असून मृद व जलसंधारण, पीक लागवड पध्दती, खते आणि पाणी व्यवस्थापन, रोग व किडींचे नियंत्रण, औजारे, हरितगृहातील शेती, प्रक्रिया, दुग्धशास्त्र आदींविषयी सखोल संशोधन करुन 1431 हून अधिक महत्वपूर्ण शिफारसी प्रसारित करण्यात आल्या आहेत. विद्यापीठाने पेरणी, रोपलावणी, आंतरमशागत आणि काढणीसाठी विविध प्रकारची 34 सुधारित यंत्रे व औजारे विकसित केली आहेत.

विद्यापीठाचा संशोधनाचा इतिहास बघता या विद्यापीठाने विकसित केलेले विविध पिकांचे वाण राज्यातच नव्हे तर पूर्ण देशात शेतकर्यांमध्ये सर्वाधिक प्रचलित आहे. यात महत्वाचे वाण म्हणजे उसाचा फुले 265. या वाणाने उत्पादनाचे नवे उच्चांक गाठले असून क्षारयुक्त जमिनीत शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न देत आहे. त्याच बरोबर गव्हाचे-त्रिंबक, नेत्रावती, फुले समाधान वाण; ज्वारीचे – रेवती, चित्रा, सुचित्रा, फुले अनुराधा, फुले वसुधा वाण; सोयाबिनचे डी.एस. 288, जे.एस.-335, फुले अग्रणी इ. पिकांच्या वाणांनी शेतकर्यांचे उत्पन्न वाढवून त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे. हरभर्याचे विजय, विशाल, दिग्विजय, विराट या वाणांनी राज्यात नव्हे तर देशातील शेतकर्यांची मने जिंकली आहेत. राज्याला व देशाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या वाणांचा मोठा वाटा आहे.

महाराष्ट्रातील फळबागांच्या विकासामध्ये या विद्यापीठाचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे. विद्यापीठाचा ‘फुले केशर’ हा आंब्याचा वाण हापूसनंतर सर्वाधिक पसंतीचा वाण आहे. कोरडवाहू फळबागांसाठी तो वरदान ठरला आहे.
दुग्धव्यवसाय किफायतशीर होण्यासाठी या विद्यापीठाने चार टक्के स्निग्धांश असणार्या आणि एका वितात तीन हजार लीटरपेक्षा जास्त दूध देणार्या ‘फुले त्रिवेणी’ या संकरित गायीची निर्मिती केली आहे. दूध उत्पादनात दुसरी धवलक्रांती आणण्याची ताकद या गायीत असल्याने शेतकर्यांमध्ये ती अधिक प्रचलित होत आहे. याशिवाय जैवतंत्रज्ञान, कोरडवाहू शेती, पाणी व्यवस्थापन, पीक पध्दती, पीक संरक्षण, जीवाणू, खते निर्मिती, फळ व भाजीपाला प्रक्रिया, शेतीसाठी सुधारित औजारे अशा विविध बाबींवर अमूल्य असे संशोधन केले आहे व अविरत सुरु आहे. बदलते हवामान, जैविक-अजैविक ताण, पाणीटंचाई इत्यादी दरवर्षी निर्माण होणार्या समस्यांवर संशोधन होऊन त्यांचे निष्कर्ष वेळोवेळी वर्तमानपत्रे, मासिके, इलेक्‍ट्रॉनिक मीडियाव्दारे शेतकर्यांसाठी प्रसिद्ध केले जातात.

लोकाभिमुख कृषि विस्तार कार्य – कृषि विद्यापीठात विकसित झालेले तंत्रज्ञान शेतकर्यापर्यंत परिणामकारकरित्या पोहचविण्यासाठी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय सदैव प्रयत्नशील असते. विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शेतकरी, कृषि अधिकारी आदींसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, शेतकरी मेळावे, आद्यरेखा प्रात्यक्षिके, परिणाम प्रात्यक्षिके इ. विस्तार शिक्षण उपक्रमांचे प्रत्येक जिल्हयातील विभागीय विस्तार केंद्र, जिल्हा विस्तार केंद्र, कृषि विज्ञान केंद्रे, विस्तार गटामार्फत आयोजन करण्यात येते. त्याचबरोबर 42 शेतकरी शास्त्रज्ञ मंच व 51 दत्तक गावांमार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार होत असतो. या व्यतिरिक्त आकाशवाणी, दूरदर्शन, इलेक्‍ट्रॉनिक मीडियाव्दारे शेतीविषयक विविध कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. वर्तमानपत्रे, मासिके इ. लिखित साहित्यातून हंगामनिहाय, क्षेत्रनिहाय व शेतकर्यांच्या गरजेनुसार तंत्रज्ञानाची माहिती वेळोवेळी प्रसिध्द केली जाते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्याचा सर्वांगीण विचार केला असता असे जाणवते की, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान हे शेतकरीभिमुख असून ज्या शेतकर्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होऊन या शेतकर्यांचे जीवनमान उंचावले आहे.

– अशोक मंडलिक
वार्ताहर, राहुरी विद्यापीठ


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)