शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुपटीसाठी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची

कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा , राहुरीत कृषी विज्ञान केंद्र कार्यशाळेचे उद्‌घाटन

कृषी विज्ञान केंद्राने शेतकरी समस्यांवर अभ्यास करावा
राहुरी विद्यापीठ – सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. या कामी कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथा यांनी केले. ते विद्यापीठात आयोजित कृषी विज्ञान केंद्रांच्या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पुणे अटारीचे संचालक डॉ. लाखन सिंग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे आणि हैद्राबादच्या अटारीचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजिंदर रेड्डी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. विश्‍वनाथा म्हणाले की, दुग्धव्यवसाय हे एकात्मिक शेती पध्दतीचे मूलभूत अंग असून, त्याद्वारे शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्न मिळत आहे. याशिवाय कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांना कुक्‍कुटपालन, मत्स्यशेती, मधुमक्षिकापालन यासारख्या कृषी आधारित व्यवसायांवर मार्गदर्शन करावे. सेंद्रिय खतांचा वापर वाढवून गांडूळ खते तसेच जैविक खतांचा वापर करून शेतकऱ्यांनी पीक लागवडीचा खर्च कमी करण्यावर भर द्यावा. कृषी विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर अभ्यास करून पीक पध्दतीचे नियोजन करावे, असे ते म्हणाले.

डॉ. लाखन सिंग म्हणाले की, अशा कार्यशाळेद्वारे कृषी विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांची माहितीची देवाण-घेवाण होऊन शेतकऱ्यांसाठी उत्तम आराखडा तयार करता येईल. कृषी विज्ञान केंद्रांनी आपल्या शेतावर उत्तम प्रकारचे प्रात्यक्षिके आयोजित करून शेतकऱ्यांना निमंत्रित करावे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घ्यावी. विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी दृक-श्राव्य सादरीकरणाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले. डॉ. भगवान देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. गोकुळ वामन यांनी आभार मानले. याप्रसंगी धुळे कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेल्या भेंडीवरील एकात्मिक कीड व्यवस्थापन या घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी कृषी विज्ञान केंद्राचे 124 शास्त्रज्ञ तसेच विभागप्रमुख उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)