शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे राज्य सरकारचेच पाप

  • खासदार राजू शेट्टींचा हल्लाबोल; फडणवीस सरकारवर साधला निशाणा

नाशिक – सरकारमुळे राज्यातील शेतकऱ्यांवर भीक मागण्याची वेळ आली असून त्यांच्या आत्महत्या हे राज्य सरकारचे पाप आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी येथे शेतकरी मेळाव्यात केला.
राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी विरोधापक्षांकडून कर्जमाफीसाठी राज्यात रान पेटवले आहे. त्यातच आता राजू शेट्टी यांनीही फडणवीस सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमीभाव मिळत नाही. शेतकरी 100 रुपये खर्च करुन 60 रुपये कमावत आहे. त्यामुळे त्याची अवस्था दयनीय बनल्याचे ते यावेळी म्हणाले. योग्य हमीभाव मिळत नाही म्हणूनच राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. त्यासाठी कर्जमाफीची मागणी होत असतानाही मुख्यमंत्री फडणवीस अजूनही अभ्यासच करत आहेत, अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.
शेतकऱ्यांना यावेळी कर्जमुक्त केले नाही, तर पुढच्या निवडणुकीत शेतकरी सरकारला हद्दपार करतील, अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला. सरकारच्या प्रस्तावित समृद्धी महामार्गालाही त्यांनी यावेळी विरोध दर्शवला. स्मार्ट सिटी उभ्यारण्यासाठी शेतकऱ्यांची जमीनच तुम्हाला सापडली का? असा सवालही त्यांनी केला.
शेट्टी म्हणाले की, राज्यातील उद्योजकांनी 1 लाख 76 हजार रुपयांचे कर्ज बुडवले. मग राज्यातील शेतकऱ्यांना पैसे देताना लकवा का येतो?’ कर्जमुक्ती हा शाश्वत उपाय नसून ती शेतकऱ्यांसाठी सलाईन आहे. यावर कायमस्वरूपी उपचार करण्यासाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली. शेतीमध्ये फायदा होतोय हे सिद्ध करावे, मगच शेतकऱ्यांवर प्राप्तिकर आकारण्यात यावा, असे ते म्हणाले. सरकारच्या अपयशी धोरणामुळे राज्याचे 2 लाख 93 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)