शेतकरी जाणार एक जून रोजी संपावर

शेतकरी बचाव समिती अध्यक्ष प्रभाकर बांगर
मंचर, दि. 18 (प्रतिनिधी) -1 जून रोजी होणाऱ्या संपात सर्व शेतकरी सहभागी होणार आहे. शेती उत्पादने त्यादिवशी विक्रीसाठी पाठवायचे नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. संप यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष व किसान क्रांती समन्वय समितीचे सदस्य प्रभाकर बांगर व वनाजी बांगर यांनी केले आहे.
पुणतांबे येथील काही लोकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन 1 जून रोजी होणारा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असला तरी 1 जून रोजी होणारा राज्यव्यापी शेतकऱ्यांचा संप हा होणारच असल्याचा दावा शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष व किसान क्रांती समन्वय समितीचे सदस्य प्रभाकर बांगर यांनी केला आहे.
शेतीमालाला बाजारभाव नाही, कर्जमुक्‍ती नाही. हमीभाव नाही. शेतीला पुरेशा दाबाने वीजपुरवठा नाही. इत्यादी कारणांसाठी एकदिवसीय संप होणार आहे. पुणतांबे गावातील शेतकऱ्यांनी संपाची संकल्पना सर्वप्रथम मांडली असली तरी हा विषय पुणतांबे गावापुरता मर्यादित राहिला नसून राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाबाबतच्या भावना तीव्र आहेत. 1 जूनपासून संपाबाबत शेतकरी ठाम आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेतकरी बांधवांचा विश्‍वास राहिला नाही. ज्या लोकांचा किसान क्रांती संघटनेशी संबध नाही. अशा लोकांना घेऊन मुख्यमंत्री चर्चा करतात. या बाबींना किसान क्रांती कवडीचेही महत्व देत नाही. एक आठवड्यापूर्वी पुणे येथे किसान क्रांतीच्या राज्याच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करणारी एकही व्यक्‍ती हजर नव्हती. यावरून हे स्पष्ट होते की 1 जून रोजी होणाऱ्या संपाशी यांचा काहीही संबध नाही. मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या अशा लोकांना हाताशी धरून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे. हा डाव शेतकरी उधळून लावतील. तरी शेतकरी बांधवांनी अशा भुलथापांना बळी न पडता केंद्र आणि राज्य सरकारला कोंडीत धरण्यासाठी 1 जून रोजी शेतकऱ्यांनी संपावर जायचे आहे. त्यादृष्टीने गावोगाव शेतकरी मेळावे घेऊन तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःहून संपात उतरण्याचा निश्‍चय केल्याची माहिती सदस्य प्रभाकर बांगर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)