शेतकरी कर्जमाफीची व्याप्ती वाढवली…

2001 पासूनच्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ


3 लाख 49 हजार शेतकरी ठरणार पात्र


इमूपालन, शेडनेट, पॉलिहाऊससाठी घेतलेल्या कर्जाचाही होणार समावेश


सरकारच्या तिजोरीवर 3139 कोटींचा भार

मुंबई – नापिकि व सततच्या दुष्काळामुळे कर्जाच्या खाईत अडकलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहिर केली होती. सरकारने आता या योजनेची व्याप्ती वाढवली असून या योजनेचा लाभ 2001 ते 2009 या कालावधीतील कर्ज थकित असलेल्या, परंतु 2008 व 2009च्या कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे सुमारे 3 लाख 49 हजार शेतकरी लाभार्थी ठरणार असून सरकारच्या तिजोरीवर 3200 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे.

-Ads-

कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या होत्या. त्यामुळे शेतकरी संघटनांबरोबरच राजकिय पक्षांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी करीत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले होते. अखेर राज्यातील फडणवीस सरकारने नमते घेत 1 एप्रिल 2009 ते 30 जून 2016 पर्यंतच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जारी केली होती. मात्र, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 पर्यंत उचल केलेल्या पीक किंवा मध्यम मुदत कर्जाची 30 जून 2016 रोजी थकित झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंतच्या मुद्दल व व्याजासह एकूण दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 पर्यंत वाटप केलेल्या पीक कर्जापैकी 30 जून 2016 पूर्वी किंवा नंतर पुनर्गठित किंवा फेरपुनर्गठित झालेल्या कर्जाचे 31 जुलै 2017 पर्यंत थकित व उर्वरित हप्ते दीड लाखाच्या मर्यादेपर्यंत असल्यास त्याचा कर्जमाफी योजनेत समावेश करण्यात येणार आहे. पीक कर्जाच्या पुनर्गठन किंवा फेरपुनर्गठनाची थकित रक्कम दीड लाख रुपयांपेक्षा अधिक असल्यास एकरकमी परतफेड योजनेनुसार शेतकऱ्यांनी दीड लाखावरील थकीत रक्कम 30 जून 2018 पर्यंत भरल्यास त्यांना दीड लाख रकमेच्या मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.

इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या थकित शेतकऱ्यांनाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून दिलासा देण्याचा महत्त्वाचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. त्यानुसार 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2016 पर्यंत इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या आणि अशा कर्जापैकी 30 जून 2016 रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून 31 जुलै 2017 पर्यंतची मुद्दल व व्याजाची थकित रक्कम दीड लाखाच्या मर्यादेत माफ करण्यात येणार आहे. या थकबाकीदार शेतकऱ्यांचे अल्प किंवा अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या पूर्वीच्या निकषाप्रमाणे सरसकट कर्जमाफी देण्यात येणार आहे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)