शेतकरी-आदिवासांच्या मागण्या मान्य ; सरकारचे लेखी आश्वासन

सरकारचे लेखी आश्वासन : तीन महिन्यात प्रलंबित प्रकरणे निकाली काढणार 

मुंबई: विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी काढलेला “उलगुलान मोर्चा’ मिटण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या असून त्यांना लेखी आश्वासन देण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन सरकारने मोर्चेकऱ्यांना दिले आहे.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. आदिवासी जमिनीच्या पट्टेधारकांना सर्व दुष्काळी सवलत देण्यात येणार आहेत. तर शेतीसाठी खवटी अनुदान देण्याबाबतही निर्णय झाला असल्याची माहिती सरकारने दिली. गैरआदिवासी आणि आदिवासींना तीन पिढीची रहिवासीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. याबाबत राज्य-केंद्राला शिफारस करणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

वन्य जमीन पट्ट्याच्या प्रकरणातील 80 टक्के दावे सरकारने फेटाळले होते. या दाव्यांचे सरकार पुनरावलोकनही करणार आहे. सर्व दावेदारांची नावे एकाच सातबाऱ्यावर न चढवता स्वतंत्र सात-बारे दिले जाणार आहेत. वन हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी भागातील गावच्या 50 टक्के लोकांची उपस्थिती अनिवार्य होती. मात्र आता गावाऐवजी पाड्याचा घटक ग्राह्य धरला जाणार आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात 50 गावात 25 ते 30 हजार बंगाली शरणार्थी आहेत. ज्याप्रमाणे सिंधी शरणार्थींचे पुनर्वसन केले त्याप्रमाणे बंगाली शरणार्थींना समान कायद्यानुसार पुनर्वसित करणार असल्याचे सरकारने मान्य केले आहे.

आझाद मैदानात ठिय्या 

वनाधिकार कायदा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा विविध मुद्द्यांवर सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने हा मोर्चा काढण्यात आला होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आझाद मैदानावरुन उठणार नाही, असा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केला होता. या मोर्चातील सुमारे 400 आंदोलकांची तब्येत बिघडली. ठाण्यातून मुंबईच्या दिशेने अनवाणी येणाऱ्या या शेतकऱ्यांच्या पायांना जखमा झाल्या होत्या. तर काही जण तापाने फणफणले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)