शेतकरी आंदोलकांना दिल्ली बाहेरच रोखले 

आंदोलकांवर लाठीमार, अश्रुधुराचा वापर 
नवी दिल्ली: उत्तरप्रदेशातून दिल्लीकडे मोर्चाने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांना दिल्लीच्या बाहेरच रोखण्यात आल्याने आज तेथे पोलिस व आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला. या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर आणि पाण्याच्या फवाऱ्याचा मारा केला. त्यात अनेक आंदोलक जखमी झाल्याने आंदोलन चांगलेच चिघळले होते. गांधी जयंतीच्या दिवशीच शेतकऱ्यांवर हिंसाचार करण्यात आल्याचा आरोप करीत विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार टिका केली आहे.
भारतीय किसान युनियनच्या शेतकऱ्यांनी हा मोर्चा आयोजित केला होता. हरिद्वार पासून दिल्ली पर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चाचा समोराप किसान घाटावर माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांच्या समाधी स्थळावर होणार होता पण या शेतकऱ्यांना दिल्ली उत्तरप्रदेश सीमेवरच अडवण्यात आले. त्यामुळे हे शेतकरी संतप्त झाले होते. त्यांनी पोलिसांचे अडथळे दूर करून आत घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळले. सरकारच्या या कृतीचा निषेध करून आंदोलकांचे नेते नरेश टिकैत म्हणाले की आमच्या मागण्या आम्ही आपल्या सरकारकडे करायच्या नाहीत तर आम्ही काय पाकिस्तान आणि बांगलादेशाकडे जाऊन करायच्या काय? आम्ही सरकारकडे भीक मागत नाहीआम्हाला आमच्या हक्‍काचे अधिकार मिळालेच पाहिजेत यासाठी हे आंदोलन आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने सरकारकडे आमच्या मागण्या मांडण्यासाठी जात असताना आमच्यावर बळाचा वापर केला गेला हे संतापजनक आहे असे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव इत्यादींनी जोरदार शब्दात निषेध केला आहे. अहिंसा दिनीच शेतकऱ्यांवर हिंसाचार करून सरकारने गांधी जयंतीची चांगली सुरूवात केली आहे अशा उपरोधिक शब्दात राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
संपुर्ण कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाची पुर्ण अमंलबजावणी करावी, 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना निवृत्तवेतन जारी करावे, इंधन आणि विज बिलावर सबसीडी द्यावी या आणि अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन होते.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)