शेअर मार्केट गुंतवणूकीतून आकर्षक परतावा देण्याच्या अमिषाने सेवानिवृत्त पोलीस अधीक्षकांची फसवणूक

पोलिसांनी केले एकाला अटक


न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

पुणे- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याला 5 ते 10 टक्के व्याजाने परतावा देण्याचे अमिष दाखवून सेवानिवृत्त पोलीस अधीक्षकांना 16 लाख 10 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी मुंबई येथील एकाला अटक केली आहे. त्याला 19 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.ए.सय्यद यांनी दिला आहे.
आदित्यराजे यशवंत देशमुख (वय 35, रा. खारघर, नवी मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक बालाजी संतोष केंद्रे (वय 60, रा. गोकुळनगर, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सन 2015 ते 2 जून 2018 या कालावधीत घडली. बोनाझा कम्युडीटी ब्रोकर्स प्रा.लि.या शेअर मार्केट कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास महिन्याला 5 ते 10 टक्के परतावा देण्याचे अमिष देशमुख यांनी केंद्रे यांना दाखविले. त्यांच्याकडून धनादेश आणि रोख स्वरूपात वेळोवेळी 16 लाख 10 हजार रुपये घेतले. ते पैसे देशमुख याने कंपनीत न गुंतवता स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी देशमुख याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील पैसे जप्त करण्यासाठी, फिर्यादींकडून घेतलेले धनादेश कोठे वटवले, त्याने बोनांझा कम्युडीटी ब्रोकर्स नावाने बनावट खाते उघडले आहे का, याचा तपास करण्यासाठी, त्याच्यावर 2012 मध्ये भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील राजश्री कदम यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जी.आर.सोनवणे अधिक तपास करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)