सेन्सेक्‍स 509 अंकांनी गडगडला

डॉलरच्या तुलनेत रुपया 72.73 वर

मुंबई: रुपयाच्या मूल्यामध्ये सुरू असलेली घसरण आज मंगळवारीही सुरूच राहिली. आज दुपारनंतर रुपया 28 पैशांनी घसरला. तर आंतरराष्ट्रीय बाजारातून क्रूड तेलाच्या खरेदीच्या किंमतीतही वाढ झाली आणि एका पिंपासाठी 78 डॉलर इतकी किंमत झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 72.73 पैसे इतके घसरले. या सर्व घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावर झाला आणि सेन्सेक्‍समध्ये 500 पेक्षा अधिक अंकांची घसरण झाली.

सोमवारीही मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 450 अंकांची घट झाली होती. आज दिवसाच्या सुरुवातीला निर्देशांकामध्ये सकारात्मक वातावरण होते. सेन्सेक्‍समध्ये 89.45 अंक आणि निफ्टी निर्देशांकात 30 अंकांची वाढ झाली होती. बॅंका आणि निर्यातदारांनी केलेल्या समभागांच्या विक्रीच्या पार्श्‍वभुमीवर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही 20 पैशांनी वधारले होते. मात्र दिवसभरात ही तेजी कायम राहू शकली नाही आणि निर्देशांकात घसरण सुरू झाली. दिवसअखेरपर्यंत ही घसरण सुरूच राहिली. त्यामुळे रुपयाचेही मूल्य डॉलरच्या तुलनेत 72.45 वरून 28 पैशांनी घसरून 72.73 वर पोहोचले. निर्यातदारांमधील नैराश्‍याचे वातावरण आणि देशांतर्गत उद्योगांमधील घसरणीमुळे दुपारी सेन्सेक्‍स निर्देशांकांमध्येही 500 अंकांची घसरण झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स निर्देशांकात 509.04 अंकांची घट झाली आणि निर्देशांक 37,413.13 अंकांवर पोहोचले. तर राष्ट्रीय शेर बाजारचाच्या निफ्टी निर्देशांकातही 150.60 अंकांची घट झाली आणि निर्देशांक 11,287.50 अंकांवर पोहोचले.

अमेरिका आणि चीन दरम्यानचा तणाव वाढण्याच्या शंकेमुळेही शेअर बाजारात मोठी घसरण झाली. अमेरिका आणि चीनमधील आर्थिक संघर्षाचा परिणाम आशियातील बाजारावर होतो आहे. त्यातच इराणकडून तेल आयात करणाऱ्या देशांवर अमेरिकेचे आर्थिक निर्बंध आहेत. यामुळे निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेच्या वातावरणातून शेअर बाजारात घसरण होते आहे, असे निरीक्षकांचे मत आहे. रुपयाची घसरण हे देखील शेअर बाजारतील घसरणीचे एक प्रमुख कारण समजले जात आहे. याशिवाय एप्रिल- जून तिमाहीत चालू खात्यावरील तूट वाढून जीडीपीच्या 2.4 टक्के इतकी झाल्याचा परिणामही शेअर बाजारावर झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)