शेअर निर्देशांकांची घसरण चालूच 

मुंबई – क्रूडचे दर वाढत आहेत. बॅंकांचा तोटा वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. उत्तर आणि द. कोरियातील चर्चा थांबली आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि उत्तर कोरियातील चर्चेतून अंग काढून घेऊ असे दक्षिण कोरियाने सांगितले आहे. रुपयाचे मूल्य कमी पातळीवर आहे. रिझर्व्ह बॅंक अनेक बॅंकांवर कारवाई करीत आहे. बॅंकांच्या मोठ्या अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे. या कारणामुळे शेअरबाजारात काल विक्रीचे वातावरण होते. कर्नाटक प्रकरण न्यायालयात गेले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तिकडेही लक्ष आहे. या कारणामुळे गुरुवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 238 अंकानी कमी होऊन 35149 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 58 अंकानी कमी होऊन 10682 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले. आज क्रूडचे दर 70 डॉलर प्रति पिंपावर गेले. त्यामुळे इंधनाचे दर वाढणार आहेत. भारतातील गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून हा मोठा चिंतेचा विषय आहे. त्याचबरोबर कंपन्याचे ताळेबंदही फारसे नफादायक नाहीत.

काल झालेल्या विक्रीमुळे ग्राहक वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 0.90 टक्‍क्‍यानी, बॅंकिंग क्षेत्राचा निर्देशांक 0.63 टक्‍क्‍यानी, धातू क्षेत्राचा निर्देशांक 0.59 टक्‍क्‍यांनी, ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक 0.14 टक्‍क्‍यांनी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 0.10 टक्‍क्‍यानी कमी झाला. मात्र रिऍल्टी क्षेत्राचा निर्देशांक 0.41 टक्‍क्‍यानी, पायाभूत सुविधा क्षेत्राचा निर्देशांक 0.28 टक्‍क्‍यांनी, भांडवली वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 0.24 टक्‍क्‍यांनी वाढला. त्याचबरोबर तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 0.08 टक्‍क्‍यांनी वाढला.

देशात आणि परदेशातील राजकीय परिस्थिती खराब झाली असतानाच या आठवड्यात महागाई वाढल्याची आणि चालू खात्यावरील तूट वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचाही गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचे दिसून आले. एप्रिल महिन्यात चालू खात्यावरील तूट 13.7 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या महिन्यापासून रुपया कमकुवत होत असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. कालही या गुंतवणूकदारांनी 699 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केली. मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 229 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

मुख्य निर्देशांकात कालपासून घट होत असली तरी स्मॉल कॅप काल 0.43 टक्‍क्‍यांनी तर मिडकॅप 0.67 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे दिसन आले. आर र्काम कंपनीचे शेअर काल मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. मात्र या कंपनीच्या शेअरच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे काल दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)