शेअर गुंतवणुकीतील काही आडवळणे, काही धोपट रस्ते (भाग-२)

शेअर गुंतवणुकीतील काही आडवळणे, काही धोपट रस्ते (भाग-१)

तिसरा महत्वाचा मुद्दा, गुंतवणूकदार व वाचकांसाठी मांडावासा वाटतो तो म्हणजे मार्केटमधील अल्फा व बीटा. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ठरविक अवधीत एखाद्या बेंचमार्क इंडेक्सनं १० % परतावा दिला व त्याच कालावधीत जर आपल्या पोर्टफोलिओनं १२% परतावा दिला तर फरकाचे २ टक्के म्हणजे अल्फा. तर बीटा हे प्रमाण एखाद्या शेअरची चंचलता मोजण्याचं बाजारातील मापक आहे. समजा एखाद्या शेअरचा बीटा १.५ असल्यास, मुख्य निर्देशांकात १० % वाढ झाल्यास ढोबळमानानं तो शेअर १५% वाढू शकेल. हेच उदाहरण उलट्या प्रकाराने देखील घेता येईल,म्हणजेच जर बाजार १० टक्के पडला तर हाच शेअर १५% पडू शकतो. इथं बाजाराचा किंवा प्रमुख निर्देशांकाचा ज्याच्याबरोबर त्या शेअरची तुलना केली जाते,त्याचा बीटा हा १ गृहीत धरलेला असतो. त्यामुळं जेंव्हा बाजार अगदी तळाजवळ असतो तेंव्हा अशा प्रकारच्या शेअर्समधील गुंतवणूक ही निर्देशांकापेक्षा अधिक अल्फा उत्पन्न करून देऊ शकते, अर्थातच जोखीमेच्या अधीन राहून.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कांही कंपन्या ह्यांना बाजारातील एकूण वातावरणाशी काही संबंध नसतो. बाजार पडत असताना ते वरती जातात किंवा बाजार वरती असताना त्यांचे भाव तळात असतात. उदा. मागील आठवड्यात कांही कंपन्यांचे शेअर्स हे वर्षभरातील नीचांकी भाव नोंदवत असताना एसकेएफ इंडियाच्या शेअर्सनं ५२ आठवडी उच्चांक नोंदवला (१९९० रु.). दुसरं उदाहरण म्हणजे विप्रोच्या शेअर्सचं. २०१८ मध्ये बाजारानं २६ ऑक्टोबर रोजी तळ गाठला होता (निफ्टी १०००४) मात्र विप्रोचा शेअर त्याच्या ५२ आठवडी सर्वोच्च भावापेक्षा फक्त १६ रुपयेच कमी होता आणि मागील आठवड्यातच या शेअरनं २ मार्च २००० नंतरचा सर्वोच्च भाव (३७९.७ रु. समायोजित) नोंदवलाय. २६ ऑक्टोबर २०१८ च्या तळापासून आता निफ्टी १०७२४ झाली आहे, म्हणजे साडेतीन महिन्यांत साधारणपणे ७.२ % परतावा, परंतु याच विप्रोच्या शेअरनं जवळजवळ १९% परतावा दिलेला आहे.

त्यामुळं कोणता शेअर किती पडला आहे ह्यावरून तो खरेदीस योग्य असं अनुमान काढण्याच्या ऐवजी अशा कंपन्यांचा अभ्यास करताना वरील मुद्द्यांवर विचार केल्यास गुंतवणुकीची खरेदी योग्य दिशेनं होण्यास हातभार लागू शकतो. सुनील गावसकरनं आपल्या कारकिर्दीत एकूण १२५ कसोट्या खेळल्या व त्यांत ३४ शतकं झळकावली तर तो १०८ एकदिवसीय सामने खेळून केवळ एकच शतक झळकावू शकला. याचा गुंतवणुकीशी काय संबंध हे सूज्ञास सांगणे नको. कोणत्या रंगाचा गुलाब कधी द्यायचा, कधी वापरायचा व कधी घ्यायचा यालासुद्धा महत्त्व आहेच की..

जाता जाता एकच प्रार्थना करावीशी वाटते,

उमलत जाते, खुलून हसते चुटुक लाल ती कळी, प्रियच्या ओठावर आणे हसूअन गालावर खळी,

न होवो परात्परा उपयोग तिचा अशा अवघड वेळी, स्मृती त्या जिवलगाच्या स्मरून अश्रू जो जो गाळी|

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)