शेअरबाजार निर्देशांकांची आगेकूच चालूच

  महागाई घसरल्यामुळे व औद्योगिक उत्पादन वाढल्याने गुंतवणूकदार आशावादी

महागाई कमी होऊन औद्योगिक उत्पादन वाढल्यामुळे सलग सातव्या दिवशी निर्देशांकांत वाढ झाली. आरोग्य, आयटी व रिऍल्टी क्षेत्र तेजीत होते. आता बड्या कंपन्या आपले ताळेबंद जाहीर करणार आहे. त्यावरून औद्योगिक उत्पादकतेचा अंदाज गुंतवणूकदारांना येणार आहे.
मुस्तफा नदीम शेख, सीईओ, ईपीक रिसर्च

मुंबई – काल महागाई कमी झाल्याची तसेच औद्योगिक उत्पादनात विस्तार होत असल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्यामुळे जागतिक बाजारात वातावरण नकारात्मक असूनही भारतीय शेअरबाजारात मात्र खरेदीचे वातावरण कायम राहीले. सलग सातव्या दिवशी आज शेअरबाजार निर्देशांकांत वाढ झाली. आता निर्देशांक सहा आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत.

शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 91 अंकानी वाढून 34192 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 अंकानी वाढून 10480 अंकावर बंद झाला. 27 फेब्रुवारीनंतर निर्देशांक प्रथमच या पातळीवर गेले आहेत. गेल्या सहा दिवसांत सेन्सेक्‍स 1082 अंकांनी वाढला आहे. त्याचबरोबर या आठवड्यातही निर्देशांकांत वाढ झाली आहे. गेल्या चार आठवड्यापासून निर्देशांक वाढत आहेत.

काल औद्योगिक उत्पादन 7.1 टक्‍क्‍यांनी वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्याचबरोबर महागाई पाच महिन्याच्या नीचांकावर गेली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आशावादी झाले आहेत. क्षेत्रीय निर्देशांकांत धातू क्षेत्राचा निर्देशांक 1टक्‍क्‍यांनी, आरोग्य क्षेत्राचा निर्देशांक 0.56 टक्‍क्‍यांनी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक 0.50 टक्‍क्‍यांनी, रिऍल्टी क्षेत्राचा निर्देशांक 0.44 टक्‍क्‍यांनी, ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक 0.33 टक्‍क्‍यांनी, पायाभूत सुविधा निर्देशांक 0.21 टक्‍क्‍यांनी वाढला. मात्र भांडवली वस्तू, तेल आणि नैसर्गिक वायू आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा निर्देशांक कमी झाला. आता गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)