शेअरबाजारावर अमेरिकन व्याजदर वाढीचे सावट

          गुंतवणूकदार सावध; निवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांकात अल्प वाढ

फेडरल रिझर्व्ह व्याज दरात पाव टक्‍क्‍यानी वाढ करण्याची शक्‍यता बाजारात चर्चीली जात आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदार फारसे व्यवहार करताना दिसत नाहीत. त्याचबरोबर भारतीय कंपन्यांचे शेअर आवश्‍यकतेपेक्षा जास्त वाढले असल्याचे अजूनही समजले जात आहे. त्यातच महागाई वाढत असल्याने व्याजदर वाढून परतावा कमी होण्याची शक्‍यता गुंतवणूकदारांना वाटते. रुपयाचे मूल्यही गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे.
– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजी वित्तीय सेवा

मुंबई, दि. 20-निवडक खरेदीमुळे पाच दिवसानंतर शेअर बाजार निर्देशांकात अल्प वाढ झाली असली तरी बाजारातील अनिश्‍चितता संपलेली नाही. आता गुंतवणूकदारंचे लक्ष फेडरल रिझर्व्हच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे लागले आहे.
उद्या रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल पाव टक्‍के व्याजदर वाढीची माहिती जाहीर करतील असे समजले जाता आहे.अमेरिकेने काही धातूवरील आयात शुल्कात अगोदरच वाढ केली आहे. या कारणामुळे गेल्या पाच दिवसांत निर्देशांक कमी झाले होते.
रुपया घसरल्यामुळे आणि शेअरचे दर कमी असल्यामुळे आज माहीती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची बरीच खरेदी झाल्याचे दिसून आले.

आज सकाळी निर्देशांक कमी झाले होते. मात्र नंतर काही कंपन्याच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 73 अंकानी वाढून 32996 अंकावर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत झालेल्या एकतर्फी विक्रीमळे सेन्सेक्‍स 994 अंकानी कमी झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मंगळवारी 30 अंकानी वाढून 10124 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनीही निर्देशांकाना आज थोडाफार आधार दिला. आज जरी निर्देशांक वाढले असले तरी देशातील आणि परदेशातील अनेक कारणामुळे बाजारातील वातावरण फारच लवचिक असल्याचे ब्रोकर्संना वाटत होते.

त्यामुळे आगामी काळातही सावध व्यवहार होण्याची शक्‍यता आहे. सोमवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 292 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. 31 मार्चपर्यंत हे गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्‍यता आहे. देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी मात्र 191 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याचे दिसून आले. रुपया घसरल्यामुळे डॉलरमधील महसूल असणाऱ्या बहुतांश माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे शेअर वधारले. त्यात विप्रो, ईन्फोसिस, टीसीएस, टेक महिंद्रा कंपन्यांचा समावेश आहे. संमिश्र वातावरणामुळे स्मॉल कॅप 0.21 टक्‍क्‍यांनी कमी झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)