मुंबई – या महिन्यातील डेरिव्हेटीव्हजची मुदत संपत आल्यामुळे आणि मुडीजने विकासदराचा अंदाज कमी केल्यामुळे शेअरबाजारात विक्री चालू राहिली. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअरबाजार निर्देशांकांत घट नोंदली गेली
बुधवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 43 अंकांनी कमी होऊन 34906 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 18 अंकांनी कमी होऊन 10614 अंकावर बंद झाल्याचे दिसून आले.

जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आले.अमेरिकेबरोबरच आशियायी शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. त्यात क्रूड आणि इतर कारणांमुळे भारताचा या वर्षाचा विकासदर केवळ 7.3 टक्‍के राहण्याचा अंदाज मुडीजने व्यक्‍त केला आहे. या कारणामुळे बाजारात खरेदीचे वातावरण नव्हते.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा चालूच आहे. काल या गुंतवणूकदारांनी 407 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. मात्र देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 578 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.
वाढत असलेल्या इंधनाच्या दराचा ग्राहकावर आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्यामुळे इंधन दर कपात करण्याची मागणी होत असतानाच तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या दरात केवळ 1 पैसा कपात केली आहे.

सरकारला इंधनाची दर कपात करण्याचे सूत्र सापडत नसल्याचे एकूण बाजारात वातावरण आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होत आहे. इंधनाच्या दराबाबत गुंतवणूकदारांना नजीकच्या भविष्यात निर्णयाची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)