शेअरबाजारातला भूकंप (अग्रलेख)

गेल्या महिन्याभरात शेअरबाजारात भूकंपाचे धक्‍के जाणवत होते. देशांतर्गत आर्थिक परिस्थितीपेक्षाही जागतिक आर्थिक परिस्थिती या भूंकपांना कारणीभूत आहे. यापूर्वी शेअरबाजारात “ब्लॅक फ्रायडे’चा अनुभव वारंवार आला. या वेळी “ब्लॅक थर्स्टडे’ अनुभवला. पाच मिनिटांत चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. खरे तर ही पर्वणी समजूत शांत चित्ताने अधिक गुंतवणुकीचा विचार करण्याची आवश्‍यकता आहे; परंतु लोक नेमके उलटे करतात. जेव्हा बाजारात सेल चालू असतो आणि स्वस्तात वस्तूंची विक्री सुरू असते, तेव्हा लोक ती घेण्यासाठी घाई करतात, गर्दी करतात; परंतु शेअरबाजारात मात्र जेव्हा अशी संधी मिळते, तेव्हा हवालदिल होऊन विकण्यासाठी घाई करतात. तीन दिवसांपूर्वीच जागतिक नाणेनिधीने भारतीय आर्थिक विकासदराबाबतचा सुधारित अंदाज सादर केला. त्यानुसार विकासदर जरी खालावणार असला, तरी जगात तो सर्वाधिक असेल, असे त्यात म्हटले असल्याने आपल्याला फार घाबरण्याचे काहीच कारण नाही.

सरकार कुणाचेही असले, तरी आर्थिक स्थितीत फार फरक पडणार नाही, असा दिलासा या अहवालातून मिळतो. अमेरिकेचा विकासदरही जवळजवळ अर्धा टक्‍क्‍याने घसरणार आहे. चीनच्या विकासदरापेक्षा आपला विकासदर जास्त राहणार आहे, या सर्व दिलासादायक बाबींच्या पार्श्‍वभूमीवरही जागतिक बाजारातील घडामोडींचा भारतीय शेअरबाजारावर प्रतिकूल परिणाम होत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात होत असलेली वाढ, विनिमय दरातील घसरण, रुपयाचे डॉलरपुढचे लोटांगण यामुळे शेअरबाजारात पडझड झाली. त्यातही अमेरिकेतील शेअरबाजारात मोठी पडझड झाल्याने त्याचे परिणाम आशियाई बाजारपेठेवर झाले. भारतीय शेअरबाजारापेक्षाही अधिक पडझड अन्य बाजारांत झाली.

-Ads-

गुरुवारची सकाळ भारतीय शेअरबाजार व गुंतवणूकदारांसाठी धक्‍का देणारी ठरली. बाजार सुरू होताच मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक एक हजार अंकांच्या घसरणीसह सुरू झाला. राष्ट्रीय शेअरबाजारदेखील 250 अंकांनी घसरला. त्यामुळे निर्देशांक 33,774.89 अंकांवर पोहोचला आहे. दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण आजही सुरुच राहिली. गुरुवारी रुपया नऊ पैशांनी घसरला आणि तो 74.45 रुपयांवर पोहोचला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्‍समधील 31 पैकी 30 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण होत होती, तर निफ्टीतील 50 पैकी 46 शेअर्समध्ये घसरण होत होती.

केवळ चार कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी होत होती. ऍक्‍सेस, वेदांता, स्टेट बॅंक, टाटा स्टील, भारती एअरटेल, मारुती, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स, इंडिया बुल्स, बजाज फायनान्स, बजाज फायनान्स सर्व्हिस, ऍक्‍सिस बॅंक, आयशर मोटर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. आशियाच्या अन्य देशातील अन्य शेअरबाजारदेखील कोसळले. आशियातील अन्य बाजारांत पाच टक्‍क्‍यांची घसरण झाली. तैवान शेअरबाजार 5.21 टक्‍क्‍यांनी, जपानचा शेअरबाजार 3.7 टक्‍क्‍यांनी, कोरिया बाजार 2.9 टक्‍क्‍यांनी तर शांघाय बाजार 2.4 टक्‍क्‍यांनी कोसळला. याशिवाय चीनसह अन्य देशातील बाजारदेखील कोसळले आहेत. अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये आठ महिन्यांतील सर्वांत मोठी घसरण बुधवारी झाली. बुधवारीच शेअरबाजाराने 461 अंकांची मुसंडी घेतल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तीन लाख कोटींची भर पडली; मात्र हा दिलासा फक्‍त एका दिवसासाठीचा ठरला. सर्वाधिक नुकसान इन्फोसिस, एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअर्सचे झाले आहे.

मुंबई शेअरबाजारात सूचिबद्ध एकूण कंपन्यांचे बाजार भांडवल 134.38 लाख रुपयांवर आले आहे. गुरुवारी सर्वत्र निराशेचे वातावरण असताना जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चार डॉलर प्रतिपिंपाने कमी झाल्या, ही दिलासा देणारी बाब घडली. आता जागतिक बाजारात कच्चे तेल 82 डॉलर प्रतिपिंप आहे. ज्यांनी दीर्घकाळासाठी शेअर आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे, त्यांना अशा पडझडीने काही फरक पडत नाही. सध्या अमेरिका-चीन व्यापारीयुद्ध आणि इराणवरील तेल बंदीमुळे वाढलेले तेल दर यामुळे सगळीकडेच डॉलर मजबूत होत आहे. इतर सर्व चलने कमजोर होत आहेत. भारताने वित्तीय आणि चालू खात्यावरील तूट आतापर्यंत योग्य त्या मर्यादेत राखली आहे. तरी आता मात्र देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढते आहे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे महागाई दरात वाढ होऊ शकते. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शेअरबाजारात या सर्व घडामोडींचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. शेअरबाजारातील सध्यासारखी करेक्‍शन ही संधी समजायला हरकत नाही. शेअरबाजार खाली-वर होणारच, हे गृहीत धरले पाहिजे. घसरणीबरोबरच बैलाच्या झेपेचाही चांगला अनुभव येत असतो. त्यासाठी सज्ज होण्याची मानसिकता आपण तयार केली पाहिजे. येणाऱ्या संधीचा उपयोग करून घेतला पाहिजे.

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)