शेंडी गावाची दारूबंदी करावी-आ. पिचड

मद्य विक्रीचा परवाना परत करावे आ.पिचड यांचा पलटवार
अकोले – राजूर गावात येवून गावाच्या दारूबंदीबाबत भाष्य करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षांनी आपल्या शेंडी गावाच्या दारूबंदीची अंमलबजावणी करावी.शिवाय आपल्या शेंडी गावाच्या सरपंच बंधूच्या नावावर असणारे मद्य विक्रीचा परवाना परत करावे, असे आवाहन आमदार वैभवराव पिचड यांनी अशोकराव भांगरे यांचे नाव न घेता पत्रकार परिषद केले. सर्व आरोपांना उत्तरे देत भांगरे यांच्यावर पलटवार केला.
भांगरे यांनी राजूर गावात येवून समर्थकांसह “मूक मोर्चा’ काढला होता. शिवाय सभा घेवून व त्यापूर्वीही भांगरे यांनी पत्रकार परिषद घेवून राजूर दंगलीला आ.पिचड जबाबदार आहेत, असा आरोप केला होता. त्यामुळे सायंकाळी आ.पिचड यांनी अकोले येथे पत्रकार परिषद घेवून भांगरे यांचे सर्व मुद्धे खोडून काढले. तेव्हा पक्षाचे अध्यक्ष गिरजाजी जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मीनानाथ पांडे उपस्थित होते.
आ. पिचड यांनी माहितीच्या अधिकाराखाली उपलब्ध केलेले उत्पादन शुल्क खात्याचे पुरावे व शेंडी येथे मारहाण झालेल्या तरुणाचे फोटो पत्रकारांपुढे सादर करून आम्हाला बदनाम करणाऱ्या व्यक्तींच्या गावातच सर्वाधिक दारू विक्री होते आहे,असे पत्रकारांना सांगितले. उलट आपण, आपले वडील व माजी मंत्री मधुकरराव पिचड व आपल्या मातोश्री व राजूर गावाच्या सरपंच हेमलता पिचड यांनी दारूबंदीसाठी ऐतिहासिक काम केले आहे. याकडे पत्रकारांचे लक्ष वेधले. या उलट शेंडी व ग्रामीण भाग व्यसनाधीन बनवणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या म्हणण्यावर हरकत घ्यावी,असे खुले आव्हान दिले.
राजूर व शेंडी येथील भांडणांचा तुलनात्मक आढावा घेत आ.पिचड यांनी राजूर गावाच्या दारू बंदीला पोलीस अधिकारी चांगले काम करतात.त्यांना आम्ही विरोध करतो, असा आरोप ठेवून यापोटी व यासाठी माजी अध्यक्ष राजूर गावात मोर्चा काढतात. मग शेंडीच्या दारूबंदीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कधी मुहूर्त शोधणार असा त्यांनी नाव न घेता टोला लगावला. राजूर दारू बंदी, शेंडी दारूबंदी, शेंडी व राजूर येथे पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे व यांचा सविस्तर आढावा घेताना राघोजी भांगरे यांचे नाव घेणाऱ्या वंशजांकडे राघोजींचे गाणे नव्हते व ज्या कृष्णा सोडणरकडे होते. त्या माळकरी तरुणाला माजी अध्यक्ष व त्यांचे बंधू दारुड्या समजतात. ही दुर्दैवी बाब असल्याची पुस्ती आ.पिचड यांनी जोडली.
सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी हे राजूरच्या दंगलीला एक न्याय देतात. पण शेंडीला दुसरा न्याय देतात असा टोला लगावून शेंडीत मारहाणीत बेशुद्ध पडलेल्या कृष्णा सोडणरवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतात. माजी अध्यक्षांकडे असणाऱ्या सीसीटीव्ही फूटेजवर सर्व उजेडात येईल असा दावाही आ.पिचड यांनी केला. राजूर गावाला जातीयवादी वळण देणारे व या सर्व घटनांचा राजकीय बाजार मांडणारे माजी अध्यक्ष आपल्यावर वैयक्तिक निंदा नालस्तीचे आरोप निषेधार्ह आहेत. याचा उच्चार करून या सर्व दोन्ही ठिकाणच्या प्रकारांची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)